मंगळवेढा तालुक्याच्या दुष्काळी 35 गावातील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटतोय.

पंढरपूर LIVE 12 नोव्हेंबर 2018


मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील 35 गावे कायमस्वरूपी दुष्काळग्रस्त म्हणूनच ओळखली जातात. अतिशय तुरळक पाऊस या भागात पडत असल्यामुळे या भागात गेली अनेक वर्षे भयावह दुष्काळच पाहायला मिळत आहे. त्यामुळे हा भाग माळरान भाग, ऊसतोड कामगारांचा भाग अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. अशा परिस्थितीलाही या भागातील शेतकरी अतिशय धैर्याने सामोरे जातात हा या भागाचा इतिहास आहे. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा हा भाग दुष्काळग्रस्त असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी जास्तीत जास्त आत्महत्या करतात. पण विदर्भ आणि मराठवाड्यापेक्षाही अतिशय भयावह परिस्थिती असलेला मंगळवेढा तालुक्यातील दुष्काळी 35 गावांचा हा भाग मात्र प्राप्त परिस्थितीला मोठ्या धैर्याने तोंड देत आला आहे. त्यामुळे ज्या ज्या वेळी या भागातील दुष्काळ पाहणी दौरा विविध नेतेमंडळींकडून किंवा मंत्र्यांकडून केला गेला आहे. त्या त्या वेळी या भागातील शेतकऱ्यांचे व त्यांच्या धैर्याचे दुष्काळ पाहणी दौरा करणाऱ्यांकडून कौतुक झाले आहे.
    

पण वरचेवर या भागात पावसाचे प्रमाण अत्यल्पच होत चालले आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटताना दिसत आहे. गत महिन्याभरातच दोन ऊसतोड कामगारांनी आणि नुकतेच एका शेतकर्याने दुष्काळाला व नापिकीला कंटाळून आत्महत्या केली आहे. लवकरच या भागाचा पाणीप्रश्न नाही सुटला तर आत्महत्या करणाऱ्यांची संख्या वाढली तर नवल वाटायला नको अशीच चर्चा या भागात होताना दिसत आहे.



या सर्व घडामोडी होत असताना या भागाचे सर्व लोकप्रतिनिधी व भविष्यात निवडणूक लढवू इच्छिणारे सर्व नेते फक्त बघ्याचीच भूमिका घेताना दिसत आहेत. सर्व लोकप्रतिनिधींना व नेत्यांना हा भाग पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघात आगामी निवडणुकांमध्ये किंगमेकरची भूमिका निभावणार आहे हे माहीत असल्यामुळे या भागाच्या पाणीप्रश्नाचे राजकारण करण्यात मात्र सर्वच जण धन्यता मानत आहेत. श्रेय घेण्यासाठी पुढे पुढे येण्याचा केविलवाणा प्रयत्न करताना दिसत आहेत. या भागातील शेतकऱ्यांना मात्र कोणाच्या का दंडाने येईना फक्त पाणी मिळणे अपेक्षित आहे. तसेच मात्र होताना दिसत नसल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची नेहमीच घोर निराशा झाली आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी चक्क कर्नाटकला जोडण्याची मागणी केली आहे. पाणी मिळण्यासाठी एखाद्या साध्या माणसानेही आंदोलन उभे केले तरी त्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद व यश मिळताना या भागात दिसत आहे. या भागातील शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता लोकप्रतिनिधींनी व नेत्यांनी श्रेयवादात न अडकता सामूहिक प्रयत्न करून या भागाचा पाणी प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. अन्यथा मराठवाडा विदर्भापेक्षाही विदारक परिस्थिती या भागात पाहायला मिळेल.


















महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com