आदिवासी विद्यार्थ्यांवरी जाचक अटी रद्द करा
पंढरपूर : आदीवासी वसतीगृह बंद करण्याच्या व विद्यार्थी संख्या कमी करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात भारतीय विद्यार्थी मोर्चा, भारतीय युवा मोर्चा, भारतीय बेरोजगार मोर्चा यांच्यावतीने तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
देण्यात आलेल्या निवेदनामध्ये असे म्हटले आहे कि, शासनाच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या पंडीत दिन दयाळ स्वंय योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी अनेक जाचक अटी देण्यात आल्या असून त्या अटी रद्द करण्यात याव्यात या व इतर मागण्या मान्य करण्यात याव्यात अन्यथा संपूर्ण राज्यभर आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही संघटनेच्यावतीने या निवेदनाव्दारे देण्यात आला आहे.
निवेदनाव्दारे आदीवासी विद्यार्थ्यांना संविधानीक अनुसुची पाच व सहाचे प्रावधान शंभर टक्के लागु करण्यात यावे, शिष्यवृत्तीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात , वसतिगृहाचा कोटा वाढविण्यात यावा, सर्व आदीवासी वसतिगृहे , शासकीय इमारती विद्यार्थी संख्या पाहून स्वतंत्र जागेत इमारती बनविल्या जाव्यात, एटीकेटी असणार्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळणार नाही अशी जाचक अट रद्द करण्यात यावी, आदीम जातीच्या व अनुसुचीत जातीच्या अपंग विद्यार्थ्यांच्या भत्त्यामध्ये वाढ करण्यात यावी, आदीवासी वसतिगृहाच्या खासगी इमारती बंद करण्यात याव्यात, पंडीत दिन दयाळ स्वंय योजना बंद करण्यात यावी अशा मागण्या सादर केल्या असून या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
हे निवेदन तहसिलदार यांना सादर करताना संघटनेचे सत्यवान दुधाळ, नाथा सरवदे, योगेश कांबळे, प्रदिप परकाळे, लखन शिंदे, रवि सर्वगोड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.