काजोल देवगणचा बीफ पार्टी व्हिडीओ झाला व्हायरल

काजोल देवगणचा बीफ पार्टी व्हिडीओ झाला व्हायरल 1 May. 2017
मुंबई, दि. 30 - बॉलिवूडची सिमरन काजोल देवगणने रविवारी आपल्या फेसबुकवर शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये काजोल आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पार्टी करताना दिसत आहे. काजोलनं फेसबुक लाइव्हद्वारे या पार्टीची माहिती तिच्या मित्र-मैत्रिणी, चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडीओमध्ये काजोल सांगत आहे की, ती आणि तिच्या मैत्रिणी एका मित्राकडे दुपारच्या जेवणासाठी एकत्र जमले आहेत. यासाठी तिचा मित्र रेयाननं जेवणासाठी खास पक्वान्न तयार केले आहे. यानंतर काजोल मोबाइल कॅमेरा बाउलमधील पक्वान्नावर आणते. जे पक्वान्न तिचा मित्र रेयाननं तयार केले आहे. यावेळी रेयान त्या बाउलमधील पक्वान्नावर एक रस ओतताना दिसत आहे. यानंतर काजोल पुन्हा मोबाइल कॅमेरा स्वतःच्या चेह-यावर फोकस करुन तिचा मित्र रेयानला बोलावते व त्याला डिशबाबत माहिती द्यायला सांगते. यावेळी रेयानकडून मिळालेल्या उत्तरामुळेच काजोलचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कारण रेयाननं या डिशमध्ये बीफचा समावेश असल्याचे सांगितले. यानंतर शुटिंग संपवताना काजोल म्हणाली की, 'चला आता मला माझे हात बाउलमधील पक्वान्नात व्यस्त करायचे आहेत त्यामुळे व्हिडीओ थांबावत आहे'. या बीफ डिशवरुन आता काजोलला टार्गेट केले जात असून सोशल मीडियावर प्रत्येक जण तिला प्रश्न विचारत आहे. सध्या संपूर्ण देशात बीफवरुन असे वातावरण निर्माण झाले आहे की ज्याचा बीफसोबत संबंध दिसून आला की संबंधित व्यक्ती वादात अडकते. 2015 मध्ये बीफ खाल्ल्याच्या संशयावरुन अखलाक नावाच्या व्यक्तीचा मारहाणीत मृत्यू झाला होता. यामुळे आता बीफ खाल्याचे उघडपणे सांगण्यापूर्वी प्रत्येकजण अनेकदा विचार केला जातो. अशातच काजोलनं शेअर केलेल्या या व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. लोकं हा व्हिडीओ शेअर करुन तिच्यावर टीका करत आहेत.