पंढरपूर (प्रतिनिधी):- आज पंढरपूर शहरातील पेट्रोल पंपावर शहर युवक काँग्रेसच्या वतीने गाडया हाताने ढकलत, पेट्रोल दरवाढीचा व शासनाचा निषेध करणार्या घोषणा देत आंदोलन केलेे. आज दि.2 मे रोजी सकाळी 11 वा. 25 मि. या वेळेत पंढरपूर शहर युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी येथील पेट्रोल पंपाजवळ जमा झाले. मोटारसायकली व अॅटो रिक्षा हाताने ढकलत मोदी सरकारचा निषेध असो! महाराष्ट्र सरकारचा निषेध असो! पेट्रोल दरवाढीचा निषेध असो! पेट्रोल दरवाढ रद्द करा! अशा घोषणा दिल्या. यावेळी अनेकांनी पेट्रोल दरवाढीचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
शासनाने महामार्गावरील परमिट रुम व बिअरबार बंद केले; हा निर्णय चांगला आहे. परंतु यामुळे शासनाच्या महसुलात होणारी तुट भरुन काढण्यासाठी शासनाने पेट्रोल चे दर वाढविले आहेत. ही दरवाढ म्हणजे एकप्रकारे पठाणी वसुलीच म्हणावी लागेल. या वसुलीचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या दररोजच्या बजेटवर होतोय. हा सर्वसामान्य जनतेवर फार मोठा अन्याय आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनापूर्वी सर्व शेतकर्यांच्या तुरीचा हरेक दाणा खरेदी करु. असे जाहीर केले होते. परंतु आता फक्त नोंदणीकृत शेतकर्यांचीच तुर खरेदी करण्यात येईल अशा प्रकारचा ‘यु टर्न’ घेत मुख्यमंत्र्यांनी शेतकरी बांधवांची घोर निराशा केली आहे. हे शासन फक्त घोषणाबाजी करणारे शासन आहे. लवकरात लवकर पेट्रोल दरवाढ मागे घ्यावी तसेच शेतकर्यांना तुरी संदर्भात दिलेला शब्द पाळावा, शेतीमालास हमी भाव द्यावा. असे मत यावेळी बोलताना युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष शंकर सुरवसे यांनी व्यक्त केले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष राजेश भादुले, उपाध्यक्ष अशोक डोळ सर, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाटील, जिल्हा चिटणीस अमर सुर्यवंशी, जेष्ठ नेते दत्तात्रय बडवे, सेवा दलाचे अध्यक्ष गणेश माने, नगरसेवक किरणराज घाडगे, महादेव भालेराव, महादेव धोत्रे, ओबीसी सेलचे संजय घोडके, छावा चे सोपान देशमुख, मसुरे सर, संग्राम कारंजकर, पिंटु बुधनेर आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.