क्रूर थट्टा; पीकविम्यात मिळाले केवळ २० रुपये..!

Pandharpur Live 4 May 2017 सचिन व्हटे बीड - मोठ्या अपेक्षेने शेतकरी पीकविमा भरतात. मात्र, जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांना केवळ २० रुपये शेतसारा मंजूर करून सरकारने त्यांची अक्षरशः थट्टा केली आहे. आष्टी तालुक्यातील बावी गावात हा प्रकार समोर आला आहे. दुष्काळाचा सर्वाधिक फटका बीड जिल्ह्यातील आष्टी या तालुक्याला बसला आहे. याच तालुक्यातील बावी गावातील शेतकरी आश्रुबाई सोनवणे, नामदेव सांगळे या दोन शेतकऱ्यांना केवळ २० रुपयांचा पीकविमा मंजूर झाला आहे. तर या गावातील शेतकरी विठोबा लटपटे यांना १३० रुपये पीकविमा आल्याने गावात चर्चेला उधाण आले आहे. पीकविम्यात इतकी कमी रक्कम कशी आली, याबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत. याच गावातील आश्रुबाई सोनवणे या महिलेने शेतात काम करून पीकविमा भरला होता. पण आजच्या घडीला मात्र त्यांना पीकविम्याचे फक्त २० रुपये मिळाले आहेत. तालुक्याच्या गावाला जायचे म्हटले तरी गावातून जायला २५ व यायला २५ असे मिळून ५० रुपये खर्च येतो. मग आता हे २० रुपये घेऊन करायचे काय ? असा सवाल शेतकरी करीत आहेत. या दोन्ही शेतकऱ्यांना ही रक्कम पाहून डोक्याला हात लावून बसण्याची वेळ आली आहे. याबाबत तहसिलदार रामेश्वर गोरे यांना विचारले असता त्यांनी याबाबत विमा कंपनीकडे विचारणा करण्यास सांगितले.