कासेगाव येथील बेंदवस्ती परिसरात अवैध धंद्यांना उधाण..! तालुका पोलिसांचे दुर्लक्ष...

कासेगाव : (प्रतिनिधी):- पंढरपुर तालुक्यातील कासेगाव येथील बेंदवस्ती परिसरात गेल्या अनेक वर्षापासून अवैध धंदे खुले-आम चालत असुन पंढपूर तालुका पोलीसांचे याकडे दुर्लक्ष असल्याने ग्रामस्थांतुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. यल्लाम्मा व महामाया देवीच्या नावाने पावन झालेल्या कासेगावात अनेक वर्ष अवैध धंदे खुले आम चालत असुन त्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई पंढरपूर तालुका पोलिसांकडून केली जात नाही. गावात जुगार, मटका, गुटखा, देशी दारू विक्री खुले आम होत असुन पोलीस प्रशासन याकडे गांभीर्याने पाहत नाही. कासेगाव सारख्या मोठ्या व सुशिक्षित गावात पोलीस कर्मचारी फिरकत नसल्यामुळे अवैध धंदे चालत आहेत. हे धंदे बंद करण्यासाठी सध्या तरूण वर्ग चांगलाच आक्रमक झाला आहे. गावात सुशिक्षित बेकार तरुण वर्गाची संख्या जास्त असल्याने असे अवैध धंद्ये चालत राहीले तर युवक वर्ग व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही. यासाठी तात्काळ अवैध धंद्याचा बंदोबस्त करण्याची मागणी कासेगावातील तरुण व महिला वर्गातुन होत आहे.