केंद्राने मागवली सीना नदीची माहिती

सोलापूर - खासदार शरद बनसोडे यांनी सीना नदीच्या संदर्भात केंद्रीय जलसंसाधन मंत्री सांवरलाल जाट यांची भेट घेतली होती. त्या वेळी सीना नदी पुनर्जीवित करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला होता. खासदारांच्या भेटीनंतर केंद्रीय मंत्र्यांनी सीना नदीसंदर्भातील सगळी माहिती महाराष्ट्र शासनाकडून मागितली आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सभापती अशोक देवकते यांच्या अध्यक्षतेखाली सीना नदी समितीची स्थापना झाली आहे. खासदार बनसोडे यांनी मागील महिन्यात नदीची पाहणी केली होती. त्या वेळी नदीपात्राचे पुनर्भरण करणे गरजेचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. राजूर, बिरनाळ, औराद (ता. दक्षिण सोलापूर) येथे नदीचे पात्र बदलले आहे. त्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याचबरोबर नदीपात्रात मोठ्या प्रमाणात चिलार बाभळीचे प्रमाण वाढले आहे. नदीचे खोलीकरण करणे व तिला पुनर्जीवित करण्यासाठी राजूर परिसरातील शेतकऱ्यांनी समिती नेमली आहे. खासदार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली मागील महिन्यात केंद्रीय मंत्र्यांना नदीसंदर्भात निवेदन दिले होते. त्यानुसार केंद्रीय नदी संसाधन राज्यमंत्री सांवरलाल जाट यांनी नदीची माहिती मागितली आहे. राज्य शासनाकडून त्या नदीसंदर्भात वस्तुस्थितीजन्य माहिती मागितली आहे. केंद्र शासन नदी स्वच्छता व नद्यांचे पुनर्जीवन करण्यावर भर देत आहे. राज्य शासनही ‘नमामि चंद्रभागा’ म्हणत त्या नदीचे काम सुरू करणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सीना नदीच्या मागितलेल्या माहितीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सीना नदीसंदर्भात केंद्रीय मंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानुसार त्यांनी माहिती मागितली आहे. त्याच्या सरळीकरण, खोलीकरणासाठी केंद्राचा निधी मिळेल. त्यातून नदीचे पात्र पूर्ववत होण्यास मदत होणार आहे.