कृषी पर्यटनातून १८ कोटींचे उत्पन्न

राज्यात ३१८ केंद्रे; शेतकऱ्यांची पुढची पिढीही शेतीकडे वळेल
सोलापूर - सध्या शेतीला चांगले दिवस नाहीत असे बोलले जाते. मात्र, अशाही स्थितीत शेतीशी निगडित असलेल्या कृषी पर्यटनातून राज्यात जवळपास १८ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. राज्यातील ३१८ पर्यटन केंद्रांच्या माध्यमातून शेतकरी वेगळी वाट चोखाळत आहेत.

शेतीला जोडधंदा म्हणून कृषी पर्यटन केंद्राकडे पाहण्याची गरज आहे. सध्या दुष्काळाचे दिवस असल्याने शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. शेतकऱ्यांची मुले शेती करण्यापासून दूर चालली असल्याचे चित्र रंगविले जात आहे. मात्र, कृषी पर्यटन केंद्राच्या माध्यमातून हीच शेतकऱ्यांची मुले पुन्हा आपल्या शेतीकडे वळण्याच्या मार्गावर आहेत.

राज्यात जवळपास ३५० कृषी पर्यटन केंद्रे आहेत. त्या केंद्रांना वर्षभरात सात लाख ६८ हजार कृषी पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. त्या माध्यमातून १८ कोटींचे उत्पन्न शेतीला जोडधंदा म्हणून केलेल्या या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळाले आहे. कृषी पर्यटन केंद्रामुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. गावातील महिला बचत गटांना काम मिळाले आहे. उन्हाळ्यातील तीन महिन्यांचा कालावधी सोडला तर उर्वरित नऊ महिने कृषी पर्यटन हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालतो.

कृषी पर्यटन केंद्रात येणारे पर्यटक हे हौशी असतात. त्यामुळे पर्यटकांना आपल्या शेतावर थांबावे, असे वाटले पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या केंद्रावर चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. स्वच्छतागृह, राहण्याची सुविधा, चांगले जेवण, पर्यटकांना गुणवत्तेची फळे देण्याचे कसब शेतकऱ्याला असणे आवश्‍यक आहे. आपल्या केंद्रावर पर्यटक आल्यानंतर दुसऱ्या चार पर्यटकांना त्यांनी आपल्याकडे पाठवावे अशा प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यावर जोर हवा. सोलापूर शहराजवळ असलेल्या राजू भंडारकवठेकर यांच्या ‘अभिषेक मळा’ या पर्यटन केंद्रावर सुगीच्या दिवसांत ‘हुरडा’ उपलब्ध करून दिला जातो. शासनातर्फे वेगवेगळ्या सोई-सुविधा उपलब्ध करून देण्याची अपेक्षा या शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जाते.

शासनाच्या नवीन पर्यटन धोरणानुसार या व्यवसायाला चालना देण्यासाठी पाचवी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना दरवर्षी सहलीच्यावेळी कृषी पर्यटन केंद्राला भेटी देण्याचे बंधनकारक केले आहे. त्यामुळे या माध्यमातून शेतकऱ्यांना कायमस्वरूपी रोजगार मिळणार आहे. पाच-सात खोल्या शेतात बांधण्यासाठी कोणत्याही परवानगीची गरज असणार नाही.