शेतक-यांच्या लढ्याची, त्यांच्या हक्काची कहाणी ‘प्रोजेक्ट मराठवाडा’
शेतक-यांच्या लढ्याची, त्यांच्या हक्काची कहाणी ‘प्रोजेक्ट मराठवाडा’
अनिल चौधरी
पुणे :–
जैरश एन्टरटेन्मेंट आणि वाडिया प्रॉडक्शन व इगल आय एन्टरटेन्मेंट प्रस्तुत मराठवाड्यातील शेतक-यांच्या जगण्याची कहाणी सांगणारा ‘प्रोजेक्ट मराठवाडा’ हा हिंदी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमातून हिंदीतील दिग्गजांनी काम केले असून या सिनेमाची राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर या सिनेमाची उत्सुकता वाढली आहे. येत्या ३ जून रोजी हा सिनेमा देशभरात विविध सिनेमागृहांमध्ये रिलिज होतोय.
‘प्रोजेक्ट मराठवाडा’मध्ये एका ६० वर्षाच्या तुकाराम इंगळे नावाच्या शेतक-याची कथा सांगण्यात आली आहे. दुष्काळग्रस्त भागातील हा शेतकरी आहे. तो मुख्यमंत्र्यांच्या भेटीस आस घेऊन मुंबईला येतो. त्याच्यासोबत त्याच्या इतर शेतकरी मित्रांचे वेगवेगळ्या मंत्र्यांच्या नावाने लिहिलेले सुसाईड नोट आहेत. सोबतच त्याला त्या उद्योगपतीलाही भेटायचं आहे ज्याने त्याच्या शेतकरी मित्रांच्या जमिनी पॉवर प्लान्टसाठी विकत घेतल्या आहेत.
तो गावातील सर्व शेतक-यांचा प्रतिनिधी म्हणून मुंबईला मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी येतो. त्याला शेतक-यांच्या प्रश्नावर तोडगा काढायचा आहे. अशातच अचानक तुकारामची भेट चार पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांशी होते. त्या विद्यार्थ्यांना शेतक-यांच्या आत्महत्यांवर माहितीपट तयार करायचा असतो, मग ते तुकारामचे आणि त्याच्या शेतकरी मित्रांचे प्रश्न त्यांच्या माहितीपटात वापरतात. तुकाराम त्यांना त्याच्याकडची सगळी माहिती देतो. शेतक-यांच्या प्रश्नांची या चार विद्यार्थ्यांना समज येते आणि ते या शेतक-यांची मदत करण्याचा निर्णय घेतात. हा शेतक-यांचा विद्यार्थ्यांच्या सहायाने उभा राहिलेला लढा या सिनेमात रेखाटण्यात आला असून ते या राजकारण्यांच्या आणि उद्योजकांच्या विरोधात उभे राहू शकतात का?? हेही रेखाटण्यात आलं आहे.
‘प्रोजेक्ट मराठवाडा’ या सिनेमाचं दिग्दर्शन भावीन वाडिया यांनी केले असून प्रकाश पटेल, जिगना पटेल आणि जय प्रकाश पटेल यांनी या सिनेमाच्या निर्मितीची जबाबदारी स्विकारली आहे. तर या सिनेमात हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज म्हणजेच ओम पुरी, सीमा विश्वास, गोविंद नामदेव, दिलीप ताहील यांच्यासारख्यांनी महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. सोबतच फराह केदार, कॅरोल, कुणाल सेठ आणि राहुल पटेल यांच्याही यात महत्वपूर्ण भूमिका आहेत. तर निरज पटेल, प्रफुल पटेल, संदीप पाटील, सदीवा खान, भावीन वाडिया आणि इगल आय एन्टरटेन्मेंट हे या सिनेमाचे सहायक निर्माते आहेत.