सिडनीत टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय,
सिडनी : धोनीच्या टीम इंडियानं सिडनीच्या तिसऱ्या ट्वेन्टी20 सामन्यात सनसनाटी विजय साजरा करून ऑस्ट्रेलियात 3-0 अशा ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली.
भारतानं ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियावर क्लीन स्वीप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिडनीच्या ट्वेन्टी20त ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 198 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं.
रोहित शर्मा आणि विराट कोहलीची अर्धशतकं आणि सुरेश रैना आणि युवराज सिंगनं हाणामारीच्या षटकांत गाजवलेला पराक्रम यांच्या जोरावर भारतानं सात विकेट्स राखून विजय साजरा केला.
रोहितनं 38 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि एका षटकारासह 52 धावांची खेळी केली तर विराटनं 36 चेंडूंमध्ये 2 चौकार आणि एका षटकारासह 50 धावा फटकावल्या. मग अखेरच्या षटकात विजयासाठी 17 धावांची गरज असताना युवराज आणि रैनानं 19 धावांची लूट केली आणि भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
रैनानं 25 चेंडूंत 6 चौकार आणि एका षटकारासह नाबाद 49 धावा कुटल्या. तर युवराजनं 12 चेंडूंत 1 चौकार आणि एका षटकारासह 15 धावा करून भारताच्या विजयात महत्त्वाचं योगदान दिलं.