स्मार्ट सिटी उपक्रमांचे पंतप्रधानांच्या हस्ते जल्लोषात उदघाटन स्मार्ट सिटी उपक्रमातील शहरांमध्ये गरिबांना सामावून घेण्याची ताकत - पंतप्रधान नरेंद्र मोदी
पुणे दि. 25: आर्थिक क्षेत्रातील लोक शहरांना ग्रोथ सेंटर मानतात. त्यांच्या मतानुसार शहरात उद्योग, व्यवसाय आणि आर्थिक प्रगती होवू शकते, परंतु आता शहरांना गरिबी पचविण्याची ताकत दिली पाहिजे. स्मार्टसिटी उपक्रमातील शहरांना अशी ताकत देण्यात येत असल्याने या शहरांमध्ये गरीबांना समावून घेता येईल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे केले.
बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात “स्मार्ट सिटी” उपक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी पंतप्रधान श्री. मोदी बोलत होते. यावेळी राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पालकमंत्री गिरीश बापट, केंद्रीय राज्यमंत्री बाबुल सुप्रियो, पुण्याचे महापौर प्रशांत जगताप, खासदार अनिल शिरोळे, राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रीय, केंद्रीय नगर विकास विभागाचे सचिव राजीव गोबा उपस्थित होते.
शहरीकरण ही समस्या नाही तर ती एक संधी आहे. मोठ्या इमारती, चांगले रस्ते हीच केवळ कोणत्याही शहराची खरी ओळख नसते तर प्रत्येक शहराचा स्वत:चा आत्मा असतो, ओळख असते असे सांगत पंतप्रधान श्री. मोदी म्हणाले, ही ओळख कायम ठेवून त्यांना अधिक ऊर्जा देण्याचे काम करण्याची गरज आहे. कोणत्याही शहराच्या विकासाचा योग्य विचार हा दिल्लीत होवू शकत नाही, तर त्या शहातील लोकच तो विचार चांगल्या प्रकारे करु शकतात. याच विचारातूनच स्मार्ट सिटी संकल्पना राबविण्यात आली आहे. या संकल्पनेला देशभरातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी उपक्रमाचे चांगले परिणाम दिसू लागले आहेत. स्मार्ट सिटी ही संकल्पना एक लोकचळवळ आहे, भूतकाळातील अनुभवांवर भविष्याची पायाभरणी या योजनेतून अपेक्षीत आहे. कोणत्याही सुधारणेत लोकांचा सहभाग महत्वाचा असतो, लोकांच्या सहभागाशिवाय कोणतेही काम पूर्ण होवू शकत नाही. या स्मार्ट सिटी अभियानाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला, यासाठी काही माध्यमांनी निर्माण केलेले वातावरण,दिलेले प्रोत्साहन उपयुक्त ठरले आहे. लोकसभागामुळे स्वच्छ भारत अभियान यशस्वी झाले आहे. हे स्पर्धेचे युग आहे, त्यामुळे देशभरातील शहरांनी या स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत सहभागी झाले पाहिजे. निकोप स्पर्धेतून काही चांगल्या गोष्टी घडणार आहेत, ही नव्या बदलाची नांदी आहे, या बदलात सहभागी होण्याचे आवाहन श्री. मोदी यांनी यावेळी केले.
देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पातील शंभर शहरांमध्ये महाराष्ट्रातील वीस शहरांचा समावेश आहे. त्यातील पहिल्या यादीत पुणे आणि सोलापूर या दोन शहरांची निवड झाली आहे. राज्यातील उर्वरीत अठरा शहरांमध्ये स्मार्ट सिटीच्या अनुशंगाने राज्य शासनाने कामे सुरु केल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, राज्यातील स्मार्ट सिटी योजनेत जगातील अनेक देश सहभागी होवू इच्छितात. काही देशांनी निधी उपलब्ध करुन देण्याची तयारी दर्शविली आहे. केंद्र शासनाने या मल्टीलॅटरल फंडींगसाठी मदत करावी असे अवाहनही त्यांनी यावेळी केले.
स्मार्ट सिटी या उपक्रमाचे चार मूलगामी आधारस्तंभ आहेत, त्यात प्रथम सुशासन आणि जबाबदारीने काम करण्याचे अश्वासन देण्यात आले आहे. दुसरा स्तंभ म्हणजे सेवा आणि सुविधा पारदर्शक तसेच गतीमानपणे मिळण्याची हमी देण्यात आली आहे. तर तिसरा स्तंभ म्हणजे चोऱ्या आणि तुटींवर नियंत्रण मिळवून सेवा कमी दरात उपलब्ध करुन देण्याची सोय आणि सर्वात महत्वाचा चौथा आधारस्तंभ म्हणजे समाजातील सर्व घटकांना त्यात योग्य स्थान मिळत आहे, सर्वांच्या जीवनात परिवर्तन येत आहे असे सांगून स्मार्ट सिटीच्या माध्यमातून खेड्यांबरोबरच शहरांचाही विकास होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या संकल्पनेमुळेच शहरे ही संकट न होता त्यास संधीचे स्वरुप प्राप्त झाले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
यावेळी श्री. नायडू म्हणाले, स्मार्ट सिटी हा उपक्रम देशाच्या विकासाचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. या उपक्रमामुळे शहरातील सामान्य लोकांचे जीवन सुसह्य होणार आहे. देशातील सर्व बदलांची सुरूवात महाराष्ट्रातील पुणे शहरातून झाली आहे. त्या अर्थाने पुणे हे ऐतिहासिक शहर आहे. त्यामुळेच या कार्यक्रमासाठी पुणे शहराची निवड करण्यात आली आहे. या उपक्रमातही पुणे शहर चांगली कामगिरी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते स्मार्ट नेट पोर्टल, मेक युवर सिटी कॉन्टेस्ट तसेच स्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवडण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यामधील विविध शहरातील 84 उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. यात पुण्यातील 14 उपक्रमांचाही सहभाग होता. यावेळी व्हिडीओ कॉन्फरंसींगव्दारे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू, उडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक आणि राज्यस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी पंतप्रधानांशी संवाद साधला.