विठ्ठल मंदिरात वैद्यकीय उपचार वेळेत न मिळाल्याने महिला भाविकाचा मृत्यु मंदिर समिती विरोधात भाविकांसह पंढरपूरकर संतप्त!

       
  पंढरपूर (भगवान वानखेडे):- श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या मुंबई येथील एका विठ्ठल भक्त महिलेला पांडुरंगाचे मुखदर्शन घेतल्यानंतर अचानक छातीत दुखु लागल्याने श्‍वास घेणेस त्रास होऊ लागला. तब्बल अर्धा तास वैद्यकीय उपचाराविना ही महिला भाविक तीव्र वेदनेने विव्हळत होती परंतु कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय उपचार वेळेत न मिळाल्याने या महिलेचा विठ्ठल मंदिरातच दु:खद मृत्यु  झाल्याची चर्चा मंदिर परिसरात चालु होती. हे वृत्त समजताच भाविकांसह अनेक पंढरपूरकरांमधुन मंदिर समितीच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

 याबाबत समजलेले सविस्तर वृत्त असे की, राजुबाई भगवानदास राजानी (वय-60), रा. प्रथमेश अपार्टमेंट, 30, उल्हास नगर, मुंबई ही महिला आपल्या कुटूंबासह आज पंढरपूर येथील  विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी आली होती. सकाळी साडे नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास पांडुरंगाचे मुख दर्शन झाल्यानंतर अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. श्‍वास घेण्यास या महिलेला त्रास होऊ लागला. या महिलेला तिच्या पतीने रुक्मिणी मंदिरासमोरच्या रुक्मिणी मंडपात बसविले व मोठमोठ्याने ओरडुन मदत मागितली पण कुणीही मदतीसाठी धावले नाही. मंदिर समितीच्या कर्मचार्‍यांनी अथवा एकाही जबाबदार अधिकार्‍याने विठ्ठल मंदिरात तीव्र वेदनेने विव्हळणार्‍या या महिला भाविकाकडे लक्ष दिले नाही. अखेर या महिलेचे पती भगवानदास राजानी यांनी स्वत:च खाजगी वाहनाने या महिलेला येथील अपेक्स हॉस्पिटल येथे दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले. यानंतर येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीनंतर या महिलेचा मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतला.  पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असुन अधिक तपास एएसआय शेरखाने हे करीत आहेत.

विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने मंदिर परिसरात एखादे सुसज्ज असे आरोग्य सुविधा केंद्र असावे व येथे कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी असावेत तसेच समितीची रुग्णवाहिका कायमस्वरुपी उपलब्ध असावी ही मागणी गेल्या कित्येक वर्षापासुन सर्वच स्तरातुन होत आहे. मंदिर समिती चे अधिकार्‍यांनी मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याने आजतागायत याबाबत कोणतेही पाऊल उचलले गेले नाही. आज जर या भाविक महिलेस तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होऊन तिच्यावर वेळेत उपचार झाले असते तर कदाचित तिचा प्राण वाचला असता. अशी प्रतिक्रिया अनेक भाविकांमधुन उमटलेली आढळली. तातडीनेे वैद्यकीय उपचार न मिळाल्याने एका महिला भाविकाचा विठ्ठल मंदिरात मृत्यु झाल्याचे वृत्त समजताच भाविक भक्तांसह अनेक पंढरपूरकर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती विरोधात संतप्त झाले होते.

मंदिर समितीच्या अधिकार्‍यांची निष्क्रीयता अधोरेखीत
आजतागायत मंदिरात अनेकदा भाविकांचा जीव वेगवेगळ्या कारणाने धोक्यात आल्याच्या घटना  घडलेल्या आहेत. याबाबत महत्वाच्या घटनांमध्ये विठ्ठलाच्या गाभार्‍यात वरच्या भागातील जुन्या काळात बसविलेला लाकडी वासा अचानक खाली पडला होता. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नव्हती. यानंतर एका लहान बालिकेस मंदिरात सर्पदंश झाला; याही घटनेत  सुदैवाने ही लहान मुलगी बचावली होती. परंतु यांसारख्या घटना घडल्यानंतर मंदिर समितीने मंदिराजवळ अ‍ॅम्ब्युलन्स, प्रथमोपचार केंद्र व अत्यावश्यक औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करावी याबाबत ची मागणी वारकर्‍यांसह पंढरपूर मधील नागरिकांमधुन होत होती. मंदिर समितीच्या अधिकार्‍यांनी याबाबत आजतागायत कोणतीही हालचाल केली नाही. आज घडलेल्या घटनेनंतर विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीच्या अधिकार्‍यांची निष्क्रीयता आज पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे.


 अ‍ॅम्ब्युलन्ससह वैद्यकीय सुविधा कायमस्वरुपी करु-प्रांताधिकारी संजय तेली
मंदिर परिसरात सुसज्ज अशी आरोग्य सुविधा उपलब्ध करणेसाठीचे प्रयत्न चालु आहेत. कायमस्वरुपी मंदिर परिसरात सुसज्ज अशी रुग्णवाहिका उपलब्ध होणेसाठीही प्रयत्न चालु होते. कांही दात्यांनी मंदिर समितीला अ‍ॅम्ब्युलन्स देऊ असे आश्‍वासन दिले होते. आत्ता कोणत्याही प्रकारची वाट न पहाता तातडीने आषाढी  यात्रेपूर्वी मंदिर परिसरात वैद्यकीय अधिकारी, रुग्णवाहिका व वैद्यकीय सुविधा कायमस्वरुपी उपलब्ध करु. अशी माहिती प्रांताधिकारी संजय तेली यांनी दिली.


 मंदिर समितीची प्रेस नोट! खरे-खोटे विठ्ठलालाच माहित!!
ही घटना घडल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांकडून विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकार्‍यांना धारेवर धरले. सदर महिलेला वैद्यकीय उपचार पुरविण्यास मंदिर समिती असमर्थ ठरली ही बाब निदर्शनास आणुन दिली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने प्रसिध्दीमाध्यमांकडे मेलद्वारे प्रेसनोट देण्यात आली. यामध्ये सदर महिलेस उपचारासाठी नेणेसाठी 108 क्रमांकावर कॉटेज हॉस्पिटल, नगरपरिषदेत अ‍ॅम्ब्युलन्स मंदिर समितीमधील ड्युटीवरील कर्मचार्‍यांनी व पोलिसांनी दुरध्वनी केला पण कोणतीही रुग्णवाहिका तातडीने उपलब्ध झाली नाही. यानंतर रिक्षाने या महिलेस उपचारासाठी नेण्याचे प्रयत्न केले पण स्थलतेमुळे ते शक्य झाले नाही. यानंतर चौङ्गाळा येथील खाजगी वाहने आणण्याचाही प्रयत्न केला. वाहन उपलब्ध झाल्यानंतर महिलेच्या नातेवाईकांनी तिला अपेक्स हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचारासाठी दाखल केले. तथापी तेथे महिलेस मृत घोषीत केले वगैरे मजकुर आहे. ही प्रेसनोट पहाता सामान्य माणसाला सुध्दा प्रश्‍न पडेल की, रुक्मिणी सभामंडप हा व्हीआयपी गेटलगत आहे. तेथे ही महिला विव्हळत होती कितीही स्थुल व्यक्ती असली तरी तिला व्हीआयपी गेटमधुन तात्काळ बाहेर आणुन रिक्षात बसवणे खरंच एवढे पण कठीण काम होते का..? असो या प्रेस नोटमधील खरे-खोटेपणा बाबत काय ते विठ्ठलालाच माहित!