शहरीकरणाकाडे समस्या म्हणून नाही तर संधी म्हणून पाहायला हवे: पंतप्रधान
शहरीकरणाकाडे समस्या म्हणून नाही तर संधी म्हणून पाहायला हवे: पंतप्रधान
स्मार्ट सिटी मिशनच्या वर्षपूर्तीनिमित्त पुण्यामध्ये आयोजित सोहळ्यात पंतप्रधानांचा सहभाग
पुणे, 25 जून 2016
‘अमृत’ व स्मार्ट सिटी मिशनच्या वर्षपूर्तीनिमित्त पुण्यामध्ये आयोजित केलेल्या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सहभागी झाले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की, विकासाच्या मार्गावर पुढे जात असताना एक नवीन गोष्ट पाहायला मिळत आहे ती म्हणजे शहरांमध्ये विकासासाठीची स्पर्धा सुरु झाली आहे. या स्पर्धेमध्ये जनभागीदारी नोंदवताना सकारात्मक वातावरण दिसून येत आहे. पंतप्रधानांनी यावेळी जोर देऊन सांगितले की, शहरातील नागरिकांनी आपल्या शहराच्या विकासासाठी निर्णय घ्यायला हवेत, दिल्ली मध्ये बसून हे निर्णय घेतले जाऊ शकत नाहीत. याशिवाय प्रशासनाचा सक्रीय सहभाग यामध्ये महत्वपूर्ण आहे.
शहरीकरणाकडे एक शाप म्हणून बघण्याचे दिवस आता राहिले नाहीत. आता ही एक संधी आहे. शहरे प्रगतीची केंद्रे आहेत, जेथे नागरिक आपल्या समस्यांची उत्तरे शोधू शकतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच शहरांनी ओला व सुक्या कचऱ्याचे व्यवस्थापन करावे, यावरही त्यांनी भर दिला.
पंतप्रधानांच्या संबोधानाआधी आंध्रप्रदेश, ओडिशा व राजस्थानच्या मुख्यमंतत्र्यांनी कार्यक्रमात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. त्यांनी उपस्थितांसमोर आपले विचार मांडले. यावेळी पंतप्रधानांनी स्मार्ट नेट पोर्टल व पुण्याच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांचे उद्घाटन देखील केले. याशिवाय ‘मेक युअर सिटी स्मार्ट’ या स्पर्धेचे देखील उद्घाटन केले.
याप्रसंगी महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय शहर विकास मंत्री वैंकय्या नायडू, केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय शहर विकास राज्यमंत्री बाबुल सुप्रियो व खासदार अनिल शिरोळे देखील उपस्थित होते.