राष्ट्रगीत गाताना छाती अभिमानानं फुलून येते: सचिन तेंडुलकर
राष्ट्रगीत गाताना छाती अभिमानानं फुलून येते: सचिन तेंडुलकर
मुंबई: माजी कसोटीपटू निलेश कुलकर्णीच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘स्पोर्टस हिरोज’ या राष्ट्रगीताचं अनावरण काल दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत करण्यात आलं. याचवेळी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं मैदानावरील आपल्या काही आठवणींना उजाळा दिला.‘2011च्या विश्वचषक अंतिम सामन्यात प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या वानखेडे मैदानावर राष्ट्रगीत गाणं हा आपल्या आयुष्यातील सर्वात गौरवशाली क्षण होता.’ असं तेंडुलकर म्हणाला.
इतंकच नव्हे तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर पुढे असंही म्हणाला की, “जेव्हा आपण जण-गण-मन म्हणत असतात तेव्हा आपली मान नेहमी उंचावलेली असते. मात्र, जेव्हा तुम्ही मैदानाच्या मधोमध उभं राहून आपलं राष्ट्रगीत गातात त्यावेळेस छाती अभिमानानं फुलून येते. संपूर्ण स्टेडिअम राष्ट्रगीत गात असतं आणि तो आवाज तुमच्या कानात घुमतो. हा क्षण फारच अभिमानास्पद असतो.”
“तुम्ही खेळताना अनेक विक्रम रचतात. स्वत:साठी, संघासाठी पण जेव्हा आपल्या राष्ट्रगीताबद्दल बोलणं सुरु होतं तेव्हा या सगळ्या गोष्टी मागे पडतात.” असंही सचिन म्हणाला.
‘स्पोर्टस हिरोज’ या राष्ट्रगीताचं अनावरण दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत करण्यात आलं. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, धनराज पिल्ले, गगन नारंग, सानिया मिर्झा, सुशील कुमार, महेश भुपती, भायचंग भुतिया अशा क्रीडाविश्व गाजवणाऱ्या दिग्गजांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
हे सर्वजण या राष्ट्रगीताच्या व्हिडिओमध्ये मुलांना खेळांकडे वळण्याचा संदेशही देत आहेत. या व्हिडीओचं दिग्दर्शन अभिजित पानसे यांनी केलं आहे, तर संगीत दिग्दर्शन राम संपत यांनी केलं आहे.
‘जन गण मन’ या राष्ट्रगीताला 66 वर्ष पूर्ण होत आहेत, या निमित्ताने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर या राष्ट्रगीताचं अनावरण करण्यात आलं आहे.