राज्याचा रिमोट माझ्याकडे, मुख्यमंत्र्यांचा सेनेला टोला

मुंबई – 23 जानेवारी : बाळासाहेबांचा रिमोट तुमच्याकडे आला आणि राज्याचा रिमोट तुम्ही माझ्याकडे दिलात याबद्दल आभार आणि हा रिमोट आता माझ्याकडे आहे हे बाकीच्या मंत्र्यांनी समजून घ्यावं,असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेनेच्या मंत्र्यांना लगावला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एसटी कर्मचार्‍यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त एसटी कर्मचार्‍यांच्या मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी चांगलीच टोलेबाजी केलीये. बाळासाहेबांचा रिमोट तुमच्या हातात आला. तो रिमोट इथं तुम्ही चालवला. पण युतीच्या सरकारला चालवण्याची जबाबदारी माझ्याकडे दिलीये. तो रिमोट माझ्या हातात दिलाय. आता हा रिमोट माझ्याकडे आहे हे बाकीच्या मंत्र्यांनी समजून घ्यावं,असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावलाय. तसंच शिवशाहीही पाच वर्ष कायम राहिल आणि उत्तमप्रमाणे काम करेन असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तर काही योजनांना बाळासाहेबांचं नाव देण्यात आल्यानं काहीजणांच्या पोटात दुखतंय,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीये. तसंच ज्यावेळेस कामं बोलत असतं त्यावेळी आपण बोलण्याची गरज नाही. दिवाकर रावते यांच्या गाडीला मध्यंतरी अपघात झाला होता. या अपघातातून रावते सुखरुप बचावले. पण, आपण सिटबेल्ट लावला होता म्हणून बचावले अशी त्यांची पहिली प्रतिक्रिया होती. परिवहन मंत्री असून ते सर्व नियम ते पाळता. पण, काही मंत्री नियम करुनही ते पाळत नाही असा टोलाही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचं नाव न घेता लगावला.
दरम्यान, एसटी कर्मचार्‍यांनी त्यांचा एक दिवसाचा पगार दुष्काळग्रस्तांसांठी दिला. याबद्दल मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी कर्मचार्‍यांचं कौतुक केलंय.