वाळू माफियांच्या 40 बोटी उद्ध्वस्त
पंढरपूर : बारामतीच्या प्रांताधिकाऱ्यांनी वाळू माफियांना चांगलाच धडा शिकवला आहे. उजनीत अनधिकृतपणे वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांच्या 40 पेक्षा जास्त बोटी प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी जिलेटीन स्फोटकांनी उडवून दिल्या.
इंदापूर तालुक्यातील पळसदेव डाळज भागात गेल्या काही दिवसांपासून रोज लाखो रुपयांची वाळू बोटींच्या मदतीने उपसली जात होती. पुणे जिल्ह्यातील भिगवण, डाळज, पळसदेव , दौंड तालुक्यातील काही भागात आणि सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील काही भागात पसरलेल्या उजनी जलाशयाच्या पाण्यातील वाळूवर कब्जा करणाऱ्या या वाळू माफियांची मोठी दहशत होती. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्यास कोणी धजावत नव्हतं.या बोटी पकडल्या तरी त्याची कागदपत्रे नसल्याने खरे मासे जाळ्यातही येत नव्हते. यावर नामी शक्कल लढवत प्रांताधिकाऱ्यांनी बोटी उद्ध्वस्त करण्याची मोहीम हाती घेतली. संयुक्त पथकांनी वाळू उपसा करणाऱ्या बोटी ताब्यात घेतल्या आणि त्यावर स्फोटकं लावून त्या उडवल्या.40 बोटी उडवल्याने वाळू माफियांचं सुमारे दोन कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. जलाशयात शेवटची बोट असेपर्यंत ही कारवाई सुरु राहणार असल्याचं प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी स्पष्ट केलं आहे.