बिनपाण्याची शेती...
विजयपूर (कर्नाटक) : एक एकरातील लिंबाची बाग, शंभर झाडं, उत्पन्न महिन्याला तब्बल 1 लाख 60 हजार आणि तेही पाण्याशिवाय. पाण्याचा एकही थेंबही न देता लाखोंचं उत्पन्न देणारी ही बाग कर्नाटकात फुलली आहे. पण ही किमया करुन दाखवली आहे विजापूरच्या राजशेखर निंबर्गी यांनी. नैसर्गिक शेतीची अर्थात झीरो बजेट शेतीमध्ये त्यांनी लिंबाची बाग फुलवली आहे.
कर्नाटकातील विजयपूर जिल्हयातील बेनकनहळी गावात राजशेखर निंबर्गी यांची 45 एकर शेती आहे. त्यातून 52 प्रकारचे धान्य, मसाले आणि फळं त्यांना याच शेतीतून मिळतात. कृषी तज्ज्ञही अचंबित होतील एवढं ज्ञान या चौथी पास शेतकऱ्याकडे आहे.
निसर्ग शेती प्रत्येकाला शक्य आहे. शेतातल्या टाकाऊ वस्तू शेतातच टाकायच्या. त्यावर अच्छादन टाकायचं. ज्यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहतो. कालांतराने या वस्तू कुजतात आणि त्यातून पाणी तयार होतं. हेच पाणी शोषून घेण्याची ताकद झाडांमध्ये असते. त्यामुळे वातावरणात असलेलं पाणी जमिनीत मुरवणं हे सोपं आहे. या अच्छादनामुळे जमीन कायम हिरवीगार राहू शकते, असं राजशेखर निंबर्गी सांगतात.