कुष्ठरोग निर्मूलनाच्या उपक्रमात खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांनी सहभाग घ्यावा- डॉ. अभिमन्यु खरे

पंढरपूर-दि. 14:-
कुष्ठरोग निर्मूलनाच्या उपक्रमात खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांनी उत्सुर्फतपणे सहभाग घेवून देवी व पोलिओ रोगाप्रमाणे कुष्ठरोगाच्या समुळ उच्चाटनासाठी पुढे यावे असे आवाहन सोलापूरचे  कुष्ठरोग विभागाचे सहायक संचालक  डॉ. अभिमन्यु खरे यांनी केले.
            राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलनाअंतर्गत पंढरपूर शहर व तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांसाठी आयोजित केलेल्या कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. श्रीनिवास कोरुलकर, नगर परिषद रुग्णालयाचे डॉ. अनिल जोशी, इंडियन मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. पंकज गायकवाड उपस्थित होते.
            डॉ. खरे म्हणाले, समाजामध्ये असलेले कुष्ठरोग शोधणे त्यांना त्वरीत व नियमित उपचारासाठी आणणे, विना विकृती रुग्ण बरे करणे, अस्तित्वात असलेल्या विकृती रुग्णांचे वैद्यकीय, शारीरिक, सामाजिक व आर्थिक पुनर्वसन करणे या  कुष्ठरोग निर्मुलनाअंतर्गत कार्यक्रमाची जिल्हा स्तरावरुन प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. या कार्यक्रमात खाजगी वैद्यकीय व्यावसायीकांचा सहभाग मिळाल्यास कुष्ठरोगाचे  समुळ उच्चाटन होण्यास मदत होणार आहे. यावेळी त्यांनी कुष्ठरुग्णांना शासन स्तरावरुन मिळणार्‍या मोफत सोयी-सुविधांची माहिती देवून पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया व झालेल्या कामाची माहिती दिली.
पंढरपूरातील त्वचा व कुष्ठरोग तज्ञ डॉ. अमित मेणकुदळे यांनी कुष्ठरोगा बाबतची शास्त्रीय माहिती स्लाईड शो व्दारे उपस्थितांना दिली. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव शिंदे यांनी        कुष्ठरोगाबाबतची लक्षणे व बहुविध औषधोपचारांची माहिती दिली. कार्यशाळेस तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोदले यांच्यासह आयएएम चे पदाधिकारी, उपजिल्हा रुग्णालय व नगरपरिषद रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, शहर व तालुक्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायीक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार नागरी कुष्ठरोग केंद्राचे कुष्ठरोग तंत्रज्ञ डी.के. घोडके यांनी केले.