सोलापूर जि. प. च्या सेस फंडातून पावणेदोन लाख मुलींची हिमोग्लोबिन तपासणी

सोमवार, 18 जानेवारी 2016

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबिन तपासणी करण्यासाठी पाच लाख रुपयांची तरतूद केली आहे. त्या तपासणी मोहिमेची सुरवात पाटकूल (ता. मोहोळ) येथे काल मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांच्या हस्ते झाली. जिल्ह्यातील एक लाख 75 हजार 561 मुलींची तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी मोहीम 30 जानेवारीपर्यंत चालणार आहे.

जिल्ह्यातील 11 ते 19 या वयोगटातील सर्व मुलींची मोफत हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने केली जाणार आहे. पावणेदोन लाख मुलींमध्ये एक लाख 64 हजार या शालेय तर 11 हजार 553 या शाळाबाह्य मुली आहेत. या सर्व मुलींची तपासणी गावपातळीवर केली जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्यसेविका व प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांच्यामार्फत ही तपासणी केली जाणार आहे. मुलींमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढावे यासाठी मोफत आर्यन फोलिक ऍसिडच्या गोळ्या दिल्या जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मुली रक्तक्षयमुक्त करणे हा या तपासणी मोहिमेचा उद्देश असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील भडकुंबे यांनी दिली.