एमईपीकडून राज्य सरकारची घोर फसवणूक,


मुंबई : एमईपीने राज्य सरकारची घोर फसवणूक केली आहे. मुंबई एन्ट्री पॉईंटसच्या पाचही टोलनाक्यांवर एमएसआरडीसीनं केलेल्या व्हिडीओ पाहणीत वाहनांची संख्या थेट 27 ते 50 टक्क्यांपेक्षा कमी दाखवल्याचं उघड झालं आहे. आरटीआय कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी ही माहिती दिली आहे.
एमएसआरडीसीनं जुलै 2015 मध्ये पाचही टोलनाक्यांवर व्हिडीओग्राफी करुन वाहनांची संख्या तपासली. यातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
तसंच टोलनाक्यांवर पैसे देताना एका वाहनाचा जवळपास 4 मिनिटांचा वेळ वाया जातो. यामुळं मुंबईकरांचे वर्षाला 6260 कोटी रुपये पाण्यात जातात.
याउलट एमईपीची वर्षाची टोलवसुली फक्त 222 कोटी रुपये आहे. त्यामुळं हा सगळा घोळ एकदाच मिटवून टाकण्याची मागणी होते आहे. तसंच सरकारची दिवसाढवळ्या फसवणूक करणाऱ्या एमईपीवर फौजदारी गुन्हे दाखल का करु नयेत, असा प्रश्न विचारला जातो आहे.
अहवालानुसार  कंत्राटदारांनी 27 ते 50 टक्के वाहन कमी गेल्याच दाखवलं आहे. (एका दिवसाची सरासरी आकडेवारी) :
टोलनाके           एमएसआरडीसी       एमईपीचे आकडे         तूट
वाशी                      91613.                     67704.               27 टक्के
मुलुंड (ईईपी)         76652.                    45848.               41 टक्के
दहिसर                   75323.                    46232.               39 टक्के
ऐरोली                    51273.                     28618.               45 टक्के
मुलुंड (एलबीएस)   14793.                     7495.                 50 टक्के
अहवालातील महत्त्वाचे मु्द्दे आणि उपस्थित राहणारे प्रश्न :-
– कंत्राटदार वाहनं कमी गेल्याचे दाखवून कमी टोल गोळा झाल्याची माहिती राज्य सरकारला देतात, हे MSRDC च्या अहवालातून स्पष्ट होतं आहे.
– त्याचप्रमाणे कंत्राटदार दर महिन्याची जी समरी सरकारकडे देते, त्यात काही महिन्यातील एक दिवस गाळलेला आहे, हे स्पष्ट होतं आहे.
– वर्ष 2013 मध्ये 31 ऑगस्ट आणि 31 जुलै हे दिवस गाळलेले आहेत, तर वर्ष 2014 मध्ये 31 जानेवारी, 31 जुलै, 30 सप्टेंबर, 31 डिसेंबर हे दिवस गाळलेले आहेत.
– त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, हे दिवस गाळले का? या दिवशी किती वाहन गेली आणि किती टोल गोळा झाला, याची माहिती सरकारला का देण्यात आली नाही.
– सरकारने कंत्राटदारांनी दिलेली माहिती पुनर्तपसणी का केली नाही?
– त्याचप्रमाणे MSRDCच्या अहवालानुसार या टोल नाक्यांवर  टोलच्या रांगेत टोल देण्यासाठी उभे राहिल्याने एका वाहनाला 4 मिनिट वेळ वाय जातो.
– कामकाजी मुंबईकरांचे वर्षाकाठी 6260 कोटी रुपयांचे नुकसान होते.
– या छोट्या वाहनांकडून फक्त 222 कोटी टोल वसूल केला जातो. पण टोल देण्यासाठी मुंबईकरांचा जो वेळ वय जातो, त्यातून 6688 कोटींचं नुकसान अर्थव्यवस्थेला नुकसान होतं.
– या सर्व गोष्टी पाहता मुंबईतील पाचही टोल नाके बंद करण्याची मागणी माहितीचे कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी केली आहे.
– हि माहिती राज्य सरकारला देऊन 30 दिवसात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
– जर सरकारने कारवाई केली नाही, तर कोर्टात जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा शिरोडकर यांनी दिला आहे.