मुलगी जन्मल्यास 5 हजार रुपये एफडी, लातुरातील लोणी ग्रामपंचायतीचा उपक्रम



लातूर : लातूर जिल्ह्यातील लोणी ग्रामपंचायतीने सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं औचित्य साधून एक कौतुकास्पद उपक्रम हाती घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही गावात जर मुलगी जन्माला आली, तर तिच्या नावे 5 हजार रुपयांची एफडी बँकेत केली जाणार आहे.

लोणी ग्रामपंचायतीने 1 जानेवारी 2016 पासून हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे. गावातील कुणाच्याही घरात मुलगी जन्मल्यास त्या मुलीच्या नावे बँकेत 5 हजार रुपयांची एफडी करुन प्रमाणपत्र मुलीच्या आई-वडिलांकडे सोपवलं जाईल, असा निर्णय लोणी ग्रामपंचायतीने घेतला आहे.

स्त्री भ्रूण हत्या वाढत आहेत. अशावेळी मुलींकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन बदलला पाहिजे. स्त्रियांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे, असं आम्हाला मनापासून वाटतं, असं लोणी गावचे सरपंच माधव पाटील यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना सांगितलं. शिवाय, ही योजना कायम चालू ठेवू, असा विश्वासही माधव पाटील यांनी व्यक्त केला आहे.