विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज..... मंगळवारी होणार बुथनिहाय मतमोजणी
पंढरपूर (प्रतिनिधी):-
पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी रविवारी मतदान होणार आहे. यासाठी साहित्य घेताना अधिकारी व कर्मचारी.
गुरसाळे वेणुनगर येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मागील 17 दिवसांपासून उमेदवारांच्या प्रचारार्थ सरसावलेल्या कार्यकर्त्यांनी अखेर विसावा घेतला. रविवारी 105 मतदान केंद्रांवर 27 हजार 33 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी विशेष तयारी केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी संजय तेली यांनी दिली.
विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या 20 जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत सभासदांना मतदान करण्याची सोय व्हावी. यासाठी 105 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. यासाठी 742 कर्मचार्यांची यंत्रणा सज्ज राहणार आहे. यातील प्रत्येक केंद्रावर 1 केंद्राध्यक्ष, 4 अधिकारी, 1 कर्मचारी व 1 पोलीस असे पथक राहणार आहे. या सर्व कर्मचार्यांना आपल्या साहित्यासह 15 बसेस व 5 खासगी वाहनांनी शनिवारी सर्व मतदान केंद्रांवर पाठविले गेले आहे. मतदान प्रकियेदरम्यान कायदा व सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलिसांच्या वतीने प्रत्येक केंद्रावर 1 आत व 1 बाहेर कर्मचारी राहणार आहे. त्याचबरोबर 10 अधिकारी, 20 कर्मचार्यांसह खासगी 5 वाहनांवरुन सर्व मतदान केंद्रांवर गस्त घालणार आहेत. यांच्यासह 200 कर्मचारी नेमण्यात आले असून, आर.एस. पी.च्या 2 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.गटविकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी, जीवन प्राधिकरणाचे उपअभियंता यांच्यासह इतर 7 अधिकार्यांना झोनल अधिकारी म्हणून नेमण्यात आले आहे.
छायाचित्रात कर्मचार्यांना नेण्यासाठी सज्ज असलेल्या बसगाड्या.
सर्व सभासदांना शांततेत मतदान करावे. मतदान केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले आहे. असल्याची माहिती पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिली आहे.
पंढरपूर येथील शासकीय धान्य गोदामात कारखान्याची मतमोजणी मंगळवारी सकाळी 9 वाजता सुरु होणार आहे. मतमोजणीसाठी केंद्रनिहाय टेबल ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक टेबलवर 3 कर्मचारी राहणार असून, संगणकीकरणासाठी 20 कर्मचारी नेमण्यात आले आहेत. यासह इतर 209 कर्मचारी मदतीसाठी ठेवण्यात आले असून, त्यांच्यावर 7 अधिकारी नियंत्रण ठेवणार आहेत. निवडणूक निरीक्षक म्हणून पणन महासंघाचे संचालक योगिराज सुर्वे यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रनिहाय मतमोजणीला सुरुवात होणार असल्याची माहिती अमित माळी यांनी दिली.