महाराष्ट्रातील चौघांसह 25 बालवीरांचा गौरव.........बाल शौर्य पुरस्कार प्रदान
नवी दिल्ली : देशातल्या 25 बालवीरांचा आज राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते नवी दिल्लीत हा गौरव सोहळा पार पडला.
देशातील 25 बालकांना शौर्याबद्दल राष्ट्रीय बालवीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. यापैकी दोन मुलांना मरणोत्तर पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये नागपुरच्या गौरव सहस्त्रबुद्धे या मुलाचा समावेश आहे. गौरवने पाण्यात बुडणाऱ्या चार मुलांचा जीव वाचवला होता, मात्र त्यांना वाचवताना त्याला जीव गमवावा लागला.
गौरवशिवाय जळगाव जिल्ह्यातील कोथळीचा निलेश भील, वर्धा येथील वैभव घांगरे, मुंबईतील वाळकेश्वरचा मोहित दळवी यांचा बाल शौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. दरम्यान शौर्य सन्मान प्राप्त मुलं प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये देखील सहभागी होणार आहेत.
गौरवची गौरवगाथा
या पुरस्कारातील सर्वोच्च “भारत पुरस्कार” गौरव सहस्त्रबुद्धेला मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. नागपूरच्या हिंगणा रोडवरील टाकळी सीम भागात असलेल्या अंबाझरी तलावात बुडणाऱ्या 4 मुलांचे प्राण गौरवने वाचवले होते. यावेळी दहावीत शिकणाऱ्या गौरवला आपले प्राण गमवावे लागले.
मोहितकडून जीवनदान
बाणगंगा तलावात बुडणाऱ्या कृष्णा पाष्टेचा जीव मोहित दळवीने वाचवला होता. दिव्याला राहणाऱ्या कृष्णाने तिसरीची परिक्षा दिली होती. उन्हाळ्याची सुट्टी लागल्याने ती मलबार हिलच्या बारकुंडनगर येथे राहणाऱ्या आपल्या मामाकडे आली होती.
घराजवळ असलेल्या बाणगंगा तलावात संध्याकाळी पाचच्या सुमारास काही मुलं अंघोळ करत होती. ऊन असल्याने तिलाही पाण्यात उतरण्याचा मोह झाला. काही वेळ काठावर राहून ती खोल पाण्यात गेली. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ती बुडू लागली.
तिचे पाय चिखलात रुतल्यामुळे तिने शेजारीच पोहत असणाऱ्या अन्य एका मुलीचा हात धरला आणि
दोघी बुडू लागल्या. तिथेच असलेल्या मोहितने हा प्रकार पाहिला. त्याने प्रसंगावधान दाखवत पाण्यात उडी घेतली आणि बुडणाऱ्या कृष्णाला तलावाबाहेर काढले. पण तिच्या नाकातोंडात पाणी गेल्याने फेस येत होता. तिला उपचारासाठी एलिझाबेथ रुग्णालयात दाखल केले.
आत्याकडे राहणाऱ्या अनाथ मोहितला जलतरणपटू होण्याची इच्छा आहे. मोहितने दाखवलेल्या असामान्य शौर्यामुळे या घटनेनंतर सर्वांनीच त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला होता.