18 ऑगस्ट 1945च्या मध्यरात्रीच नेताजींचा मृत्यू, यूकेस्थित वेबसाईटचा दावा
www.bosefiles.info या वेबसाईटचं म्हणणं आहे. या वेबसाईटने नेताजींच्या मृत्यू झाल्याचं स्पष्ट करत साक्षीदारांचे काही कागदपत्रही प्रसिद्ध केले आहेत.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू तैवानमध्ये 18 ऑगस्ट 1945 च्या मध्यरात्री झालेल्या विमान अपघातात झाल्याचं www.bosefiles.info या वेबसाईटचं म्हणणं असून यासाठी या वेबसाईटने पुराव्यादाखल 5 साक्षीदारांच्या जबानीही वेबसाईटवरुन प्रसिद्ध केल्या आहेत. यामध्ये नेताजींचे निकटवर्तीय, दोन जपानी डॉक्टर, इंटरप्रिटर आणि तैवानच्या नर्स यांचा समावेश आहे. या पाचही जणांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945 च्या मध्यरात्री तायपे विमानतळ क्षेत्रात झाल्याचं म्हटलं आहे.
“नेताजींच्या मृत्यूबाबतच्या पाचही जणांच्या जबानी सारख्याच आहेत. या पाचही जणांच्या जबानीनुसार, नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू 18 ऑगस्ट 1945च्या मध्यरात्री झाला.” असं www.bosefiles.info या वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे.
नेताजींचे सहकारी एडीसी कर्नल हबीबर रेहमान खान यांनी 24 ऑगस्ट 1945 रोजी म्हणजे सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूनंतर बरोबर सहा दिवसांनी एक पत्रक जारी केलं. या पत्रकावर कर्नल हबीबर रेहमान खान यांनी सहीही केली आहे. या पत्रकात कर्नल हबीबर रेहमान खान यांनी नेताजींच्या मृत्यूवर शिक्कामोर्तब करत त्यांनी नेताजींचे शेवटचे शब्दही नमूद केले आहेत. विशेष म्हणजे कर्नल खान हे विमान अपघातादरम्यान नेताजींसोबत होते. सुदैवाने ते या अपघातातून वाचले होते.
नेताजींचे शेवटचे शब्द होते…
“नेताजींच्या मृत्यूआधी ते (नेताजी) मला म्हणाले, माझा मृत्यू जवळ आला आहे. त्यामुळे तुम्ही देशवासियांनी संदेश द्या की, मी शेवटच्या श्वासापर्यंत देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलो आणि आता मृत्यूही देशासाठी लढतानाच आला आहे. देशवासियांनो, स्वातंत्र्यासाठी लढत राहा. आझाद हिंद सेना जिंदाबाद!”, असं पत्रक कर्नल हबीबर रेहमान खान यांनी नेताजींच्या मृत्यूनंतर बरोबर 6 दिवसांनी आपल्या सहीसह प्रसिद्ध केलं होतं.
भारतीय गुप्तचर यंत्रणांकडून चौकशी
शिवाय, विमान अपघातानंतर, म्हणजे सप्टेंबर 1945 मध्ये भारतीय गुप्तचर यंत्रणांची दोन पथकं तपासासाठी बँकॉक, सैगॉन आणि तायपेला गेली होती. गुप्तचर यंत्रणांच्या पथकांनीही नेताजींच्या मृत्यू झाल्याचं म्हटलं होतं.
तोयोशी त्सुरुता: नेताजींवर उपचार करणारे डॉक्टर
मे 1946 ते जुलै 1946 या दरम्यान ब्रिटीश सैन्याने टोकियोत या अपघाताशी संबंधित असलेल्या जपानी अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. यामध्ये जपानी डॉक्टर तोयोशी त्सुरुता यांचा समावेश होता. विशेष म्हणजे त्सुरुता हे नन्मोन लष्करी हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते, जिथे अपघातानंतर नेताजींना नेण्यात आले होते.
डॉक्टर त्सुरुता यांनी सांगितल्याप्रमाणे, “अपघातानंतर संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले. मात्र काही वेळाने ते कोमात गेले आणि अगदी काही मिनिटांनी नेताजींचा मृत्यू झाला.”