धरतीवरील स्वर्गाच्या प्रेमात बॉलीवूड

‘गर फिरदौस रुहे झमीन, अस्त हमीन, अस्तो हमीन, अस्तो हमीन’ (भूतलावर स्वर्ग जर कुठे असेल तर तो येथेच (काश्मीर) आहे, येथेच आहे, येथेच आहे ) कवीने काश्मीरच्या सौंदर्याचे वर्णन करताना या शब्दांची निवड क रण्याची गरज का पडली असावी हे काश्मीर पाहिल्यावरच लक्षात येते. काश्मीरच्या सौंदर्याची भुरळ बॉलिवूडला देखील पडली आहे. भारताच्या सर्वांत उत्तरेकडील या राज्यात प्रेमकथांची महाकाव्ये, युद्धाच्या शौर्यगाथा, राजकारणाच्या कधीही न थांबणाऱ्या अनेक कहान्या बॉलिवूडने गुंफल्या आहेत. तब्बू, कॅटरिना कैफ व आदित्य रॉय कपूर अभिनित ‘फितूर’ या चित्रपटाचे ट्रेलर काश्मीरच्या सौंदर्याची पुन्हा आठवण करून देत आहे. त्यानिमित्ताने धरतीवरच्या या ‘स्वर्गात’ चित्रीकरण झालेल्या बॉलिवूडच्या काही चित्रपटांवर ही एक नजर...
कभी कभी
भारतीय सिनेमातील सर्वांत रोमँटिक चित्रपट म्हणून उल्लेख करावा असाच हा चित्रपट रोमान्सचे बादशहा यश चोप्रा यांनी दिग्दर्शित केला. यश चोप्रा यांनी काश्मीरचे सौंदर्य अद्वितीय पद्धतीने टिपले. आल्हाददायक वातावरण व काश्मिरातील बहुतेक सर्व स्थळांवर त्यांनी चित्रीकरण केले.
कश्मीर की कली
शक्ती सामंत यांच्या या चित्रपटाचा नायक शम्मी कपूर हा त्याची नायिका शर्मिला टागोर हिला आकर्षित करण्याचा प्रयत्न करतो. या चित्रपटाचे चित्रीकरण करताना दिग्दर्शकाने लोकेशन्सची अगदी अचूक निवड केली आहे. काश्मिरी सौंदर्य अन् सुमधुर गीतांचा हा चित्रपट रोमँटिक चित्रपटांमध्ये क्लासिक मानला जातो.
जंगली
या चित्रपटाद्वारेच काश्मीरमध्ये चित्रपटांच्या शूटिंगची मालिका सुरू झाली, असे म्हणावयास हरकत नाही. या चित्रपटात गंभीर स्वभावाचा नायक आपल्या प्रेमाच्या शोधात काश्मीरला येतो. यात शम्मी कपूर व सायरा बानो यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ‘याहू... चाहे कोई मुझे जंगली कहे...’ हे लोकप्रिय गाणे याच चित्रपटातील आहे.
जब जब फुल खिले
या चित्रपटातील सर्वच गाणी अविस्मरणीय आहेत. यात शशी कपूर व नंदा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काश्मिरातील गरीब नाविक एका श्रीमंत मुलीच्या प्रेमात पडतो अशी या चित्रपटाची कथा आहे. डल झिलच्या हाऊस बोटचा आनंद अप्रतिम सौंदर्याचे दर्शन घडवितो.
जब तक है जान
या सिनेमात दाखविण्यात आलेले काश्मीरचे सौंदर्य डोळ्याचे पारणे फेडते. सैन्यातील बॉम्ब स्कॉड आफिसर असलेला शाहरूख आपल्या पहिल्या प्रेमाचा शोध काश्मिरात घेत असतो. एक नायक दोन नायिका अशी या चित्रपटाची कथा भुरभुरणाऱ्या बर्फात मस्त जमून आली आहे.
ये जवानी है दिवानी
काश्मिरातील गुलमर्ग ते मनाली या ट्रॅकिंगच्या प्रवासातून काश्मीरच्या सौंदर्याचे दर्शन घडते. दोन व्यक्तींमधील बदलणारे नाते हा या चित्रपटाचा मूळ गाभा आहे.
हैदर
विशाल भारद्वाज याने शेक्सपिअरच्या हॅम्लेट या नाटकावर आधारित चित्रपट तयार करताना काश्मीरची निवड केली. शाहिद कपूर, तब्बू, श्रद्धा कपूर व के.के. मेनन यांच्या अभिनयाची प्रशंसादेखील झाली. राजकारण, कौटुंबिक वाद, प्रेम यांची गुंतागुंत असलेला हा चित्रपट पूर्णत: काश्मीर व येथील लोकेशन्सवर शूट करण्यात आला होता. भाषा, राहणीमान व इतर गोष्टींचा मिलाफ हैदरमधून पाहायला मिळतो, अस्सल काश्मिरी चित्रपट म्हणजे हैदर.