RSSच्या कार्यकर्त्यावर विषप्रयोग
सांगली/कोल्हापूर : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रमेश पारिसनाथ शेटे यांच्यावर विषारी इंजेन्शनचा हल्ला करण्यात आला. रमेश शेटे काल पहाटे फिरायला गेले असता, दोघा अज्ञात व्यक्तींनी टोकदार वस्तूने त्यांच्या मानेवर वार केला. त्या व्यक्तींनी इंजेक्शनद्वारे विषप्रयोग केल्याचा धक्कादायक माहिती समोर आली. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरातील एका खाजगी रुगाणालयात दाखल केलं आहे.
रमेश शेटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते आहेत. तसंच ते सामाजिक कार्यकर्ते असून सार्वजनिक तालुका वाचनालयाचे ते पदाधिकारी आहे. दररोज पहाटे ते गांधी चौक इथल्या कामेरी रोड जवळील दत्त टेकडीपर्यत फिरायला जातात. रमेश शेटे नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे घराबाहेर फिरायला जाण्यासाठी निघाले. लिपारे कॉर्नर इथे त्यांना दोन अज्ञात व्यक्तींनी एसटी स्टॅण्डचा पत्ता विचारला. मी त्याच दिशेने जात आहे, तुम्हाला रस्ता दाखवतो असं म्हणत रमेश शेटे त्यांच्यासोबत चालू लागले. काही अंतर गेल्यानंतर त्यातील एका व्यक्तीने रमेश शेटे यांच्या डाव्या खांद्यावरील मानेजवळ टोकदार वस्तू टोचली आणि त्या ठिकाणाहून पळ काढला. रमेश शेटे यांच्या खांद्यावरुन रक्तस्त्राव सुरु झाला, मात्र तरीही ते पुढे चालतच राहिले. काही अंतरावर त्यांना भोवळ आली आणि डोळ्यांपुढे अंदार येऊ लागला. यावेळी तिथे फिरायला येणाऱ्या इतर व्यक्तींनी त्यांना घरी सोडलं.
रमेश शेटे यांना तात्काळ इस्लामपुरातील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. सुरुवातीला हा चेन स्नॅचिंगचा प्रकार असल्याचं वाटला, मात्र त्यांच्यावर इंजेक्शनने विष प्रयोग झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. त्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने कोल्हापुरातील अँस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. खून करण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाल्याचं आरोप रमेश शेटे यांनी केला आहे. त्यामुळे हा हल्ला पूर्ववैमन्यासातून झाला आहे का ? याचा तपास पोलिस करत आहेत. रमेश शेटे यांच्यावर सध्या आतिदक्षता विभागात उपचार सुरु आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे