बीडमध्ये भव्य-दिव्य ‘गोपीनाथ गड


बीड : गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीस्थळी म्हणजेच वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना परिसरात सुमारे अठरा एकर जागेवर भव्य-दिव्य स्वरूपाचे स्मारक उभारण्यात येत आहे. ‘गोपीनाथ गड’ या नावाने साकारत असलेल्या या प्रेरणास्थळाच्या कामाला वेग आला आहे.

Gopinath Gad 2

समाधीस्थळ : 72 फूट उंच, 111 फूट अष्टकोनी घेर असलेलं कमळाचं फूल

गोपीनाथ गडावर विविध कामे सुरू आहेत. समाधीस्थळाचे काम जवळपास पूर्ण झाले हेच या समाधीस्थळाचं विशेष आकर्षण ठरणार आहे. यालाच ध्यानमंदिर असेही म्हटले जाणार आहे. याचे काम पश्चिम बंगालमधील कारागीर करीत आहेत. अगदी नैसर्गिक कमळाप्रमाणे समाधीस्थळाची प्रतिकृती साकारली आहे. 72 फूट उंच आणि 111 फूट अष्टकोनी घेर असलेले हे कमळाचे फूल पाहणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे

प्रवेशद्वार 50 फूट उंच आणि 90 फूट रुंद

गोपीनाथ गडाचे प्रवेशद्वार हेसुद्धा भव्य आणि आकर्षक आहे. या 50 फूट उंच आणि 90 फूट रुंदी असलेल्या प्रवेशद्वाराचे कामही युध्दपातळीवर सुरू आहे. नक्षीकाम आणि रंगरंगोटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. या ठिकाणी कुशल व कलाकुसरीत निष्णात कारागीर परिश्रम घेत आहेत. प्रवेशद्वार ते साहेबांचे समाधीस्थळ यामध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजुने सुंदर बगिचा तयार करण्यात आला आहे. गडाच्या परिसरात विविध जातींची हजारो झाडे यापूर्वीच लावण्यात आली आहेत. फुलांची झाडेही मोठय़ा प्रमाणात लावण्यात आली आहेत.

गोपीनाथ मुंडेंचा 22 फूट उंच पुतळा

सर्वात जास्त आकर्षण ठरणाऱ्या गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे कामही अतिशय वेगाने सुरू आहे. पुतळा उभा करावयाच्या चबुतऱ्याचे कामही पूर्ण झाले आहे. पुतळा पंचधातुचा असून पुतळ्याची उंची 22 फूट आहे, तर पुतळा बसविण्यात येणाऱ्या चबुतऱ्याची उंची 10 फूट आहे

गोपीनाथ मुंडेंचं स्वप्न साकारण्याचं ध्येय

येत्या 12 डिसेंबर रोजी म्हणजे साहेबांच्या जयंतीदिनी गोपीनाथ गडाचे लोकार्पण भव्य दिव्य अशा सोहळ्यात  होणार आहे. सामान्य, उपेक्षित माणसाला संघर्ष करण्याची प्रेरणा, नवी उमेद व जीवन घडवण्याची उर्जा मिळेल आणि यातून गोपीनाथराव मुंडे यांच्या स्वप्नातील सर्वांगीण, उन्नत, प्रगल्भ समाज उभारणीची आशा ‘गोपीनाथ गड’ या माध्यमातून निर्माण होण्याची त्रिसूत्री समोर ठेवण्यात आली आहे.