श्री विठ्ठल कारखान्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी आमचा लढा- डॉ.बी.पी.रोंगे

पंढरपूर (प्रतिनिधी):-    सर्व सभासद, शेतकरी वर्ग व संचालकांचा आदर ठेवूनच ज्येष्ठ सभासदांच्या मार्गदर्शनानेच श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलच्या माध्यमातून कारखान्याच्या निवडणूकीत उडी घेतली आहे. केवळ कारखाना बचाव व त्याचा विकास हाच हेतू असणारआहे. आण्णा-दादांच्या काळातील कारखाना व आताचा कारखाना यात खूप तफावत आहे.हीच अनियमितता मोडून काढण्यासाठी तसेच गतवैभव मिळविण्यासाठी हा लढा आपल्या सर्वांंच्या सहकार्याने चालू असेल.’ असे प्रतिपादन श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलचे प्रमुख डॉ.बी.पी.रोंगे सरांनी केले.
       स्टेशन रोड लगतच्या कार्यालयात अर्ज भरल्यानंतर बैठकीचे आयोजन केले होते. यामध्ये अनेकजण आपल्या दबलेल्या आवाजाला वाट मोकळी करून देत होते. यावेळी डॉ. रोंगे सरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी शेतकरी सभासद उपस्थित होते. डॉ. शिंदे यांनी प्रास्ताविकात श्री विठ्ठल परिवर्तन व विकास पॅनलची भूमिका स्पष्ट करून यामध्ये सर्वांंच्या विचारांचा व मतांचा पुरस्कार केला जाईल. सर्वांंना विश्‍वासात घेवून सरांची वाटचाल राहील. यामुळे आपण सर्व विठ्ठल कारखान्याला पूर्वीचे वैभव प्राप्त करून द्यावे यासाठी पुढाकर घ्यावयाचा आहे.’ हे स्पष्ट केले. शांंतीनाथ बागल, संभाजी शिंदे, शशिकांत पाटील, काशिनाथ लवटे यांनीही सत्ताधार्‍यांच्या कारभाराचा आपला अनुभव सांगत सत्ताधार्‍यांच्याविरोधात तोफ डागली. तसेच सर्वजण एकत्रीत येवून स्वच्छ प्रतिमेच्या डॉ. रोंगे सरांच्या नेतृत्वाखाली कार्य करू व कारखान्याचा विकास करू अशी प्रतिज्ञा घेतली.
सरकार यादव, बाळासाहेब पाटील, शेतकरी संघटनेचे पंजाबराव भोसले संभाजी पवार व शौकतभाई पटेल यांनीही आपल्या कारखान्याची होत असलेली अधोगतीवर प्रकाश टाकून डॉ. रोंगे सरांशिवाय कारखान्याची प्रगती शक्य नाही अशी ठाम भूमिका घेतली. विद्यमान संचालक राजाराम सावंत म्हणाले,आण्णांच्या समर्थकांना पध्दतशिरपणे नेस्तनाबूत करण्याचा डाव आखला
जात आहे. यामुळेच कारखाना डबघाईला आला आहे.
याकरीता परिवर्तन घडविण्यासाठी डॉ. रोंगे सरांसारख्या स्वच्छ व विकासाभिमुख कारभार पाहणार्‍या नेत्यांना समर्थपणे साथ देईन.’
राजश्री पंडीत भोसले म्हणाल्या की,गुलामगिरीच्या बेडयातून सभासदांना आता मुक्त होण्याची वेळ आली आहे. आपल्या मुर्दाड वागण्याने सत्ताधार्‍यांचे भावते आहे आणि ही विरोधकांची शेवटची लडाई असणार आहे. यातून परिवर्तनच घडवायचे. सर्वांना सोबत घेवून जाणार्‍या डॉ.बी.पी.रोंगे यांच्या कल्पक नेतृत्वाखाली विकास होवू शकतो यासाठी मात्र पॅनलची ताकद वाढवायची आहे. कोणालाही न घाबरता दंडीलशाही मोडीत काढू त्याचबरोबर ढोंगीपणावर विश्‍वास टाकणे आता सभासदाने मोडावे’ असे आवाहन करून उच्च व्यवस्थापन व बौध्दिक दृष्टीने अतिशय नियोजनसंपन्न असणारे पॅनल प्रमुख डॉ. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली निश्‍चित विकास होईल व चांगले दिवस येतील’ असे अनुभवाद्वारे स्पष्ट केले.