खडसेंचा विरोधकांवर हल्लाबोल
नागपूर: विरोधकांच्या आंदोलनानंतर महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी विरोधकांवरच निशाणा साधला आहे. सरकारची चर्चा करण्यासाठी तयारी होती मात्र, काँग्रेसला मोर्चाला जायची घाई आहे. विरोधकांना शेतकऱ्यांशी देणघेणं नाही. असा हल्लाबोल खडसेंनी विरोधकांवर केला आहे.
विरोधकांनी विधानभवनात संत्री आणि बॅनर आणून जोरदार घोषणाबाजी केली. याचवेळी खडसेंनी विरोधकांवर हल्लाबोल केला. ‘विरोधकांना चर्चेत रस नाही. ‘सौ चूहे खाके बिल्ली चली हज को’ अशी यांची गत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही यांचीच पापं आहेत.’ असं म्हणत खडसेंनी विरोधकांनाच धारेवर धरलं.
‘शेतकऱ्यांच्या प्रश्नावर यांना केवळ राजकारण करायचं आहे. गेले 15 वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादी हे सत्तेत होते आणि तेव्हापासूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्यामुळे गेल्या वर्षभरात यांच्या 15 वर्षातील पापं फेडण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत.’ असं म्हणत खडसेंनी विरोधकांवर टिकास्त्र सोडलं.
दरम्यान, विधानभवनात आम्हाला नसुत्या वांझोट्या चर्चा नकोत, तर आधी शेतकऱ्यांची कर्जमाफी हवी, या भूमिकेवर ठाम राहत. विरोधकांनी आज गदारोळ घातला. त्यामुळे विधानसभेच कामकाज उद्यापर्यंत तहकूब करावं लागलं.
त्याआधी सकाळीही विरोधकांनी भवनाबाहेर कर्जमाफीच्या घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर अधिवेशन सुरु झालं खरं. मात्र, विरोधक कर्जमाफीवर ठाम होते. त्यावर चर्चा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं. मात्र चर्चा नकोत तर आधी घोषणा करा. अशी भूमिका घेत विरोधकांनी सभागृहाचं कामकाज बंद पाडलं.
कापूस आणि सोयाबिन उत्पादकांना सरकारनं एकरी २५ हजारांची मदत द्यावी, अशी मागणीही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली आहे