शेतकर्‍यांच्या समस्यांसंदर्भात आमदार भारतनाना भालके आक्रमक... विविध पक्षांचा मोर्चा.... सविस्तर वृत्त आणि फोटो

 पंढरपूर लाईव्ह/ महाराष्ट्र लाईव्ह न्युज : दि.12-12-2015
पंढरपूर : दुष्काळाच्या झळा सोसणार्‍या शेतकर्‍यांच्या विविध प्रश्‍नांना सोडविण्यासंदर्भात शुक्रवारी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार भारतनाना भालके आक्रमक झालेले आढळले. यावेळी जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामकाजाबाबत आमदार भालकेंची असलेली नाराजी स्पष्ट जाणवली. मुख्यमंत्र्यांचे जिल्हाधिकारी मुंढेंवर एवढे प्रेम आहे तर त्यांनी त्यांच्यासाठी विशिष्ट कायदा करुन वृत्तीनंतरही पाच वर्षे काम करण्याची संधी जिल्हाधिकार्‍यांना द्यावी. जिल्हाधिकार्‍यांनी कोणती चांगली कामे केली आहेत हे सांगावे. जर मुख्यमंत्र्यांना जिल्हाधिकारी चांगले काम करत असल्याचे वाटत असेल तर त्यांना नागपूरमध्ये काम करण्यासाठी घेऊन जावे, असे आ. भारत भालके यांनी सांगितले.
       

             सोलापूर जिल्ह्यात 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. परंतु अधिकार्‍यांनी अनेक ठिकाणी टक्केवारी जास्त दाखवली आहे. सोलापूर जिल्ह्यात तीव्र पाण्याची टंचाई जाणवत आहे. शेतकर्‍यांचे नुकसान होत आहे. यामुळे उजनी धरणात पाणी सोडण्याची मागणी केली होती. मात्र पुण्याच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या जिल्ह्याची बाजू व्यवस्थित मांडली. परंतु आपल्या जिल्ह्याची बाजू जिल्हाधिकार्‍यांनी मांडली नाही. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे नुकसान झाल्याचे आ. भारत भालके यांनी सांगितले.

        पंढरपूर येथे काँग्रेस, राष्ट्रवादी, बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला, यावेळी आ. भारत भालके बोलत होते. यावेळी आ. भारत भालके, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे, काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील-घाटणेकर, माऊली हळणवार, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार, नारायण मोरे, शशिकांत बुगडे, मोहन कोळेकर, राजूबापू पाटील, दिनकर पाटील, राहुल शहा, अरुणा दत्तू, निर्मला काकडे, रामेश्‍वर मासाळ, युवराज पाटील, विजयसिंह देशमुख, नितीन बागल, सुरेश कोळेकर, शांतिनाथ बागल, शंकर सुरवसे, प्रकाशआप्पा पाटील, मोहन अनपट, दत्तात्रय गणपाटील, महादेव देठे, सुधीर धुमाळ, नरसाप्पा देशमुख, किरण घाडगे, दिलीप देवकुळे, सुहास भाळवणकर, विठ्ठल धोत्रे, बाळासाहेब होरणे, संजय घोडके, संजय भिंगे, गणेश अंकुशराव, नामदेव भुईटे, महम्मद उस्ताद उपस्थित होते.

             चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे म्हणाले की, शेतकरी संघटनांनी साखरेच्या निर्यातीला अनुदान मिळण्यासाठी आंदोलन केले असते, साखर जादा किमतीने विकली असती व उसाला जादा दर मिळाला असता, 3 डीमधून पाणी सोडण्यासाठी अनेक वेळा अनेकांनी निवेदने दिली तरीही अधिकार्‍यांनी याकडे लक्ष दिले नाही. यामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले. काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील म्हणाले की, तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करुन काहीही मिळणार नाही. मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करावे लागणार आहे. या मोर्चामध्ये पंढरपूर तालुका व मंगळवेढयातील शेतकरी सहभागी झाले होते. 
           सरळ मार्गाने आंदोलन केल्यास सरकारला व प्रशासनाला जाग येत नसेल तर यापुढे गनिमी काव्याने आंदोलन करणार आहे. कोणी रस्ता अडवेल, तर कोणी रल्वे अडवेल, कोणी नदीवरील बंधार्‍यांची दरवाजे काढेल, अशा प्रकारे यापुढे आंदोलन करणार असल्याचे आ. भारत भालके यांनी सांगितले.