अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने ‘सकाळ’ने घेतलेल्या या प्रदीर्घ मुलाखत शरद पवार यांचे वक्तव्य.... ‘‘काँग्रेसमध्ये नवे नेतृत्व उभे राहू शकते ’’
पंढरपूर लाईव्ह/महाराष्ट्र लाईव्ह न्युज दि. 12-12-2015
‘‘काँग्रेसमध्ये नवे नेतृत्व उभे राहू शकते’’ असे सुतोवाच महाराष्ट्राचे धुरंधर राजकीय नेते श्री.शरद पवार यांनी केले आहे. त्यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त सकाळ न्यूज नेटवर्कसाठी पत्रकार श्रीराम पवार - प्रकाश अकोलकर यांनी शुक्रवार, दि. 11 डिसेंबर 2015 रोजी त्यांची प्रदिर्घ मुलाखत घेतली. यावेळी विविध विषयांवर त्यांनी मनमोकळेपणे आपली भुमिका स्पष्ट केली.
या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘‘काँग्रेसमध्ये गांधी घराणे हा मोठा सिमेंटिंग फोर्स’ आहे. पण त्या घराण्याशिवाय काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पर्याय उभा राहू शकतो. मात्र, तो प्रयोग गांधी घराण्याला विश्वासात घेऊनच करावा लागेल. पण तेवढे धारिष्ट्य आज तरी कोण्या नेत्यात दिसत नाही!’’ असे मत ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी सकाळ माध्यम समूहा’शी बोलताना व्यक्त केले आहे. खालीलप्रमाणे त्यांनी राजकारणातील विविध बाबीवर आपले स्पष्ट मत व्यक्त केले.
एकेकाळी काँग्रेसला पराभूत करण्यासाठी बिगर-काँग्रेसवाद राबवला गेला. त्यात हिंदुत्ववादी शक्तीही होत्या. त्यामुळेच त्या शक्तींना बळही मिळाले; पण आताच्या परिस्थितीतही बिगर-भाजप’वादाचा फायदा काँग्रेसला मिळू शकेल काय, या प्रश्नावर पवार म्हणाले, ‘‘चांगलं काम करीत राहिले तर काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर पर्याय बनू शकतो.’’ मात्र त्यासाठी काँग्रेसला आपल्या कार्यपद्धतीत बदल करावा लागेल आणि इतर पक्षांसोबत विश्वासाने काम करण्याची तयारी दाखवावी लागेल. इतर पक्षांसोबत एकत्र काम केलं तर लोक साथ देतात हे बिहारमध्ये दिसले आहे.
गांधी घराण्यापलिकडे काँग्रेस नेतृत्वासाठी जाईल का की ही शक्यताच नाही...’ या प्रश्नावर पवार यांनी तपशीलवार उत्तर दिले. ते म्हणाले : एक समजून घ्यायला हवे की काँग्रेसमध्ये गांधी घराण्याला दुर्लक्षित करता येत नाही! तोच पक्षाला एकत्रित ठेवणारा सिमेंटिंग फोर्स’ आहे. तरीही या घराण्याचा सन्मान ठेऊन वेगळे नेतृत्व पुढे आणायचा प्रयत्न यशस्वी होऊच शकत नाही, असेही नाही. नरसिंह रावांनी हा प्रयोग हुशारीने केला होता. त्यांच्या योगदानाची आवश्यक दखल घेतली गेली नाही. मात्र देशात आर्थिक क्रांती घडली याचे श्रेय रावांचे आहे. मनमोहन सिंगांनी जे नवे आर्थिक धोरण आणले त्यामागे राव कणखरपणे उभे राहिले होते, हे नाकारता येत नाही. तसा गांधी घराण्याला विश्वासात घेऊन प्रयोग होऊ शकतो; पण तेवढं धारिष्ट्य आज तरी कोणा नेत्यात दिसत नाही.
बिहारचा निकाल असहिष्णूता, धर्मनिरपेक्षतेवरचा वाद स्वाभाविकपणे चर्चेत आले त्यावर पवारांचं विश्लेषण होतं... भाजप सत्तेत आल्यानंतर त्याच्यातील मर्यादित कुवतीचे लोक वाचाळवीर बनले आहेत. वाटेल ते बोलू लागले आहेत. केवळ कार्यकर्ता स्तरावर नव्हे, तर व्ही. के. सिंह, मनीष शर्मा यांच्यासारखे मंत्री, हरियानाचे मुख्यमंत्री, आसामचे राज्यपाल व साधुसंत असलेले अनेक खासदार समाजात दुही माजवणारी विधानं करतात. त्यांना समज दिल्याचं वृत्तपत्रांत वाचलं; पण त्याचा परिणाम दिसत नाही. भाजपमध्ये शिस्त असेल आणि पक्षानं समज देऊनही मंत्र्यापासून खासदारांपर्यंत कोणी ऐकत नसल्यास काय झालं शिस्तीचं? काँग्रेसमध्ये शिस्त बिघडायला 50 वर्षं जावी लागली, भाजपला सत्तेवर आल्यानंतर 18 महिन्यांतच बेशिस्तीची लागण झाली!
पवार राष्ट्रीय राजकारणात गेले आणि राज्यात तरुण नेत्यांची एक फळी त्यांनी पुढं आणली. पंधरा वर्षांनंतर मात्र पक्षाची राज्यात घसरणच झाली, हे पाहता आपली निवड चुकली, असं वाटतं का, अशी विचारणा केली असता पवार म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली, तेव्हा तरुण कार्यकर्त्यांचा मोठा संच सोबत राहिला. 1999 च्या मंत्रिमंडळात अनेक तरुणांकडं धुरा सोपवली. आर. आर. पाटील, जयंत पाटील किंवा कितीतरी नावं सांगता येतील. अनेकांनी चांगलं काम केलं; काही अडचणीत आले. मात्र नव्या पिढीला पुढं आणावंच लागतं. मी आताही हेच करतो आहे. येणार्या काळात अनेक तरुण आमच्या पक्षात पुढं आल्याचं दिसंल. आता आमच्या पक्षाच्या यशाबद्दल लोक निरनिराळे विश्लेषण करतात. अनेक जण सांगतात, अनेक राज्यांत एक नेता निर्विवाद राज्य करतो. म्हणजे जयललिता, मुलायमसिंह... तसं महाराष्ट्रात राष्ट्रवादीला का शक्य झालं नाही? यात महाराष्ट्र आणि अन्य राज्यांतील राजकीय-भौगोलिक अंतर समजून घ्यायला हवं. आपल्याकडं मुंबई, ठाणे आणि लगतच्या पट्ट्यात 70-80 जागा आहेत. या भागात अमराठी समूहांत सक्षम नेतृत्व उभं करण्यात आम्हाला यश आलं नाही, हे खरं आहे. विदर्भात आमच्याविषयी पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व’ असा समज पसरवण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी सतत केला. त्याचा परिणाम या भागात होतो. उरलेल्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात मात्र आम्हाला चांगल्या जागा मिळतात आणि काँग्रेस किंवा भाजपखेरीज सतत 20 वर्षं 50 ते 70 जागा मिळवणारा दुसरा कोणता पक्ष आहे? आम्हाला राज्यात प्रभावासाठी आणखी कष्ट घ्यायला हवेत, हे खरं आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरूही आहेत.
आमचे काँग्रेसशी मतभेद होते, आहेत, तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची नाळ एकच आहे. काँग्रेसच्या प्रवाहातच हाती आलेला अधिकार मतभेदांपायी गमवायचा नाही, यावर मतैक्य असतं. त्यामुळे मतभेद असले, तरी तुटेपर्यंत ताणत नाही, असे सांगत पवार बिहारबद्दल म्हणाले की, नितीश आणि लालूदेखील एकाच मूळ लोहियावादी विचारांचे आहेत. या विचारातली मंडळी बुद्धिमान आहेत, कार्यक्षम आहेत. मात्र त्याचं वैशिष्ट्य असं, की ते पटकन बाजूला होऊ शकतात. जनता पक्ष मोडला तेव्हा दुहेरी निष्ठेवर आवाज उठवणारे समाजवादीच होते. जनता पार्टीचं सरकार पडलं, तेव्हा तर जॉर्ज फर्नांडिस यांनी सरकारचं जोरदार समर्थन करणारं भाषण केलं आणि मतदान विरोधात केलं, हा इतिहास आहे. मात्र आजची बिहारमधील स्थिती पाहिली, तर नितीश सर्वांना बरोबर घेऊन जातील, असं दिसतं. लालूंचा क्रिकेटपटू असलेला मुलगा मंत्रिमंडळात प्रभाव टाकू शकतो. या पुढच्या पिढीला उभं करण्यासाठीही लालूंना सरकारमध्ये राहावंच लागेल.