"सोलापूर जिल्हा" सखोल माहिती

नमस्कार... थोड़ जाणून घेऊ आपल्या जिल्हा बद्दल ..!
www.pandharpurlive.com

सोलापूर जिल्हा

राज्य महाराष्ट्र

विभागाचे नाव पुणे विभाग

मुख्यालय सोलापूर

तालुके

⚾१.उत्तर सोलापूर,
⚾२.दक्षिण सोलापूर,
⚾३.अक्कलकोट,
⚾४.बार्शी,
⚾५.मंगळवेढा,
⚾६. पंढरपूर,
⚾७.सांगोला,
⚾८.माळशिरस,
⚾९.मोहोळ,
⚾१०.माढा,
⚾११.करमाळा

क्षेत्रफळ १४,८४५ चौरस किमी (५,७३२ चौ. मैल)

लोकसंख्या ३८,४९,५४३ (२००१)

लोकसंख्या घनता २५९.३२ प्रति चौरस किमी (६७१.६ /चौ. मैल)

शहरी लोकसंख्या ३१.८३%

साक्षरता दर ७१.२

⚾लोकसभा मतदारसंघ
सोलापूर,
माढा,
उस्मानाबाद(काही भाग)

⚾विधानसभा मतदारसंघ
१ सोलापूर शहर उत्तर,
२ सोलापूर शहर मध्य,
३ सोलापूर दक्षिण,
४ बार्शी,
५ मोहोळ,
६ माळशिरस,
७ माढा,
८ सांगोला,
९ पंढरपूर,
१० करमाळा,
११ अक्कलकोट

पर्जन्यमान ५४५.४ मिलीमीटर (२१.४७ इंच)

⚽सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागी आहे.

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर (महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध्ध) व अक्कलकोटसारखी सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत.

बार्शी तील भगवंत मंदिरदेखील प्रसिद्ध आहे.

सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत.

जिल्ह्याबाबत विस्मयकारक बाब ही की स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर(शहराने) तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे.

⚾विशेष

जन्मासी येऊनी, पहा रे पंढरी !! असे पंढरपूरबाबत म्हटले जाते, ज्या पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातील भाविकच नव्हे, तर दक्षिणेकडील राज्यांतील भाविकही येत असतात असे पंढरपूर तीर्थक्षेत्र सोलापूर जिल्ह्यात आहे. यावरूनच सोलापूर जिल्ह्याचे स्थान लक्षात येते.
अनेक संतांच्या अस्तित्वामुळे सोलापूर जिल्ह्याला संतांची भूमी म्हटले जाते.

पूर्वीचे गिरणगाव, हुतात्म्यांचा जिल्हा; सध्याचे ज्वारीचे कोठार, तेलुगू, कन्नड व मराठी असा भाषा-त्रिवेणी संगम झालेला बहुभाषिक जिल्हा आणि टॉवेल, चादरी निर्माण करणारा जिल्हा म्हणून सोलापूर प्रसिद्ध आहे.

⚽जागतिकीकरणाच्या प्रभावाच्या काळात आधुनिकतेचा स्पर्श काहीशा कमी वेगाने सोलापूरला होत असला, तरीही अगत्य, मनमोकळेपणा, थोडासा साधे-भोळेपणा, पारंपरिकता, बहुभाषिकत्व हे इथल्या मातीचे गुण आहेत.

⚾पर्यटन, फलोत्पादन, कृषिप्रक्रिया उद्योग, शिक्षण, आरोग्यसेवा व कापड उद्योग (हातमाग, यंत्रमाग) या क्षेत्रांमध्ये जिल्ह्याचा विकास साधण्याची क्षमता निश्र्चितच आहे.

ऐतिहासिक महत्त्वाचे

इ.स. पूर्व २०० वर्षापासून सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजामशाही, आदिलशाही, मराठे-पेशवे व ब्रिटिश या सर्व राजवटी सोलापूर जिल्ह्याने अनुभवल्या.

यादवांच्या काळात या भागाला सोन्नलगी म्हटले जात होते.

मोगल राजवटीत यास संदलपूर असेही म्हटले जात होते.

ब्रिटिश काळात सोलापूर हे नाव रूढ झाले असावे असा अंदाज व्यक्त केला जातो.

मुंबई-चेन्नई रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे स्थानक असल्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रीय पातळीवरील सर्व राजकीय-सामाजिक घडामोडींचे पडसाद सोलापूमध्ये उमटत असत.

पहिल्या महायुद्धानंतर भारतात कामगारांनी मोठा संप पुकारला.

सोलापूरलाही जानेवारी, १९२० मध्ये कामगारांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात संप पुकारला होता.

१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीत सोलापूरकर हिरिरीने सहभागी झाले होते.

या सत्याग्रहात दारुबंदीचा प्रचार करण्यासाठी काही तरुण कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला.

या वेळी शंकर शिवदारे हा तरुण तिरंगा हातात घेऊन पुढे धावला व ब्रिटिशांच्या गोळीबारात बळी पडला. हा शंकर शिवदारे सोलापूरचा पहिला हुतात्मा. या हौतात्म्यामुळे सोलापूरकर पेटून उठले.

पण दि. ८,९ मे, १९३० या दोन दिवसांत तत्कालीन कलेक्टर नाईट याने जमावांवर अमानुष गोळीबार केला. अनेक नागरिक गोळीबारात बळी पडले.

या आंदोलनादरम्यान दि.९,१०,११ मे, १९३० असे तीन दिवस सोलापूर ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली नव्हते, मुक्त होते.

भारतातील (काही काळासाठी) स्वतंत्र झालेला असा हा पहिला भाग!
मे- जून, १९३० मध्ये सुमारे ४९ दिवस मार्शल लॉ कायदा सोलापूरला लागू होता.

या काळात सोलापूरच्या ४ निरपराध युवकांना फाशी देण्यात आले. अब्दुल कुर्बान हुसेन, मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा व जगन्नाथ शिंदे हे सोलापूरचे युवक दि. १२ जानेवारी, १९३१ रोजी धीरोदात्तपणे फासावर चढले.

या प्रेरणादायी क्रांतिपर्वामुळेच सोलापूरला हुतात्म्यांचे शहर म्हटले जाते.

पुतळ्यांच्या माध्यमातून आज या हुतात्म्यांची स्मृती सोलापुरात जतन करण्यात आली आहे. १९३०-३१ मधील या घटनांचे संदर्भ तत्कालीन केसरी मध्ये आढळतात.

भूगोल

भीमा नदी जिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.
⚾सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस अहमदनगर व उस्मानाबाद; पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारा व पुणे हे जिल्हे आहेत.

⚽जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत.

तसेच पश्र्चिम व नैर्ऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे.

या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे, तसेच थोडे विषमही आहे.

⚽काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

⚾जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा जिल्ह्याचे दोन भाग करते.

भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे.

भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते.

⚾नीरा-भीमा संगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो.

⚽जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे.

या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो.

⚾१९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते.

⚽शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे.

या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो (रोहित) पक्षी आढळतात.

भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो.

⚾भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा बोगदा आहे.

⚽उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते.

याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.

⛵पर्यटन

धार्मिक व आध्यात्मिक दृष्टिकोनातून सोलापूर जिल्हा महाराष्ट्रात महत्त्वाचा ठरतो तो प्रामुख्याने दक्षिणेची काशी असलेल्या पंढरपूरमुळेच!

आषाढी व कार्तिकी एकादशीला लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाला येतात. हे पूर्ण महाराष्ट्राचेच प्रमुख धार्मिक उत्सव आहेत.

विठ्ठल मंदिर हे शिल्पकलेचा उत्तम नमुनाही मानले जाते.

महाराष्ट्रात यादव काळापासून जी सामाजिक व आध्यात्मिक क्रांती सुरू झाली, तिचे प्रमुख केंद्र चंद्रभागेचे वाळवंटच होते. पंढरपूर सोलापूर-कोल्हापूर मार्गावर असून सोलापूरपासून ६७ कि.मी. अंतरावर आहे.

जिल्ह्यात मंगळवेढा येथे श्री दामाजीपंतांचे मंदिर आहे.

तसेच माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे अर्धनारी नटेश्र्वराचे एकमेवाद्वितीय असे हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिर आहे. बाराव्या शतकात यादव काळात या मंदिराचा जीर्णोद्धार केला गेल्याचा उल्लेख आढळतो.

दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग कुडल येथे भीमा-सीना संगम झालेला आहे. या ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनामुळे हे आज जिल्ह्यातील प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे. येथे संगमावर अकराव्या शतकात बांधलेली (कोरलेली) हरिहरेश्वर व संगमेश्वर ही अजिंठा-वेरूळची लेणी वेरुळच्या शिल्पकलेशी साम्य असलेली महादेव मंदिरे आहेत.

भारतात विष्णूची मंदिरे अतिशय कमी ठिकाणी आहेत. या जिल्ह्यात ते बार्शी येथे आहे. या हेमाडपंती स्थापत्यशैली मंदिरामुळे बार्शीला भगवंताची बार्शी म्हणतात.

एकादशीला पंढरपुरात विठोबाचे दर्शन घेणारा वारकरी द्वादशीला बार्शीच्या भगवंताचे दर्शन घेतल्याशिवाय आपल्या गावी परत जात नाही.

जिल्ह्यातील सोलापूर-मंगळवेढा रस्त्यावर, भीमा नदीच्या तीरावर माचणूर येथे महादेवाचे पुरातन मंदिर आहे.

अकलूज येथे नीरा नदीच्या काठी प्रेक्षणीय किल्ला असून करमाळा येथेही प्रसिद्ध भुईकोट किल्ला व अष्टकोनी विहीर आहे.

मध्ययुगीन काळात बहामनी राजवटीत सोलापुरात बांधला गेलेला भुईकोट किल्ला हे जिल्ह्याचे खास वैशिष्ट्य. किल्लाबांधणी शास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेला हा किल्ला १४ व्या शतकात बांधला गेल्याचे इतिहासकार सांगतात.

१६८५-८६ या काळात औरंगजेब सुमारे वर्षभर या किल्ल्यावर राहिला होता. येथेच त्याच्या टांकसाळीतून चांदीची नाणी निर्माण झाल्याचे पुरावे आढळतात. ही नाणी आजही कोलकता येथील म्युझियममध्ये आढळतात.

१७९५ ते १८१८ या काळात हा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दुसरा बाजीराव पेशवा यांचा निवास या किल्ल्यावर होता.

इंग्रजांनी सोलापूरवर आक्रमण करून बाजीरावाचा पाडाव मे, १८१८ मध्ये केला. ( इंग्रज आणि मराठे यांच्यातील शेवटची लढाई जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातील आष्टी येथे १८१८ मध्ये झाली आणि मराठेशाहीचा अंत झाला.)

अभयारण्ये

नान्नज येथीक माळढोक अभयारण्य
जिल्ह्यातील माळढोक पक्षी अभयारण्य
धर्मवीर संभाजी उद्यान तलाव (कंबर
तलाव)
पक्षी अभयारण्य - ही अभयारण्ये प्रसिद्ध आहेत.
  _________________________

संकलन : नागेश जाधव