
बाश्री : समाजातील कोणत्याही घटकास व्यक्त होण्यास निर्बंध आणल्यास त्याने लढले पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राजकीय क्षेत्रामुळे धोक्यात आले असून कलाकार, लेखक, साहित्यिक, विचारवंत यांचा आवाज दाबण्याचे काम सध्या सुरु असून, ते ऐकत नसतील तर त्यांना संपविण्याचे काम सुरु असल्याचा सूर सर्वच वक्त्यांनी 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य व आजची राजकीय परिस्थिती' या विषयावर परिसंवादात काढला.
श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर पुरस्कृत प्रगतिशील लेखक संघ व आयटक कामगार केंद्र, बाश्री यांच्या वतीने कॉ. गोविंदराव पानसरे साहित्यनगरीतील ७ व्या कॉ. शाहीर अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात क्रांतिसूर्य महात्मा फुले विचार मंचावर 'अभिव्यक्ती स्वातंत्र्य व आजची राजकीय परिस्थिती' या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांच्या अध्यक्षतेखाली या परिसंवादाचे आयोजन केले होते. या परिसंवादात बेळगावचे प्राचार्य आनंद मेणसे व भाकपचे प्रदेश सचिव भालचंद्र कागो हे सहभागी झाले होते.
परिसंवादाची सुरुवात करताना प्राचार्य आनंद मेणसे यांनी सध्या देशात तरुणांना भडकावण्याचे व त्यांचा आवाज दडपून टाकण्याचे षडयंत्र रचले जात आहे. विद्रोही लेखकांचे हात ठेचण्याचे काम सुरु आहे. दक्षिण भारतात अनेक हिंदुत्ववादी संघटना लेखकांची गळचेपी करत आहेत. ज्यांना राज्यघटना मान्य नाही अशांनी जाणीवपूर्वक ६ डिसेंबर १९९२ ला अयोध्यात विघातक कृत्य केले. नरेंद्र मोदींना विरोध करणार्या अनंत मूर्तींना धमक्या दिल्याने निवडणुकीनंतर तणावामुळेच त्यांचा अंत झाला. अनेक विचारवंत धमकीच्या सावटाखाली वावरत आहेत. अनेक प्राध्यापकांना पोलीस संरक्षणात महाविद्यालयात यावे लागत आहे. एवढेच नव्हे तर कलागुणांना वाव देणार्या व कलावंत घडविणार्या एफटीआय संस्थेवर हल्ला करुन कलावंतांचा आवाज दाबून टाकण्याचे काम सुरु आहे.
बांगला देशात ५ विचारवंतांचे खून झाले. गुलामगिरीतून मुक्तता हवी असून, त्यासाठी विचारमंथन होऊन काही तरी नवीन घडेल. कामगारांचे हक्क हिरावून घेऊन श्रमिकांना संघटना काढण्याचे हक्क दिले जात नाहीत. विचारवंत व कामगार चळवळीवर हल्ले सुरु असल्याचे मेणसे यावेळी म्हणाले.
अनंत दीक्षित यांनी व्यक्त होण्यावर निर्बंध आणल्यास लढले पाहिजे. कॉ. पानसरे यांची पुरोगामी बेरजेवर निष्ठा होती. सामान्य माणूस हाच महानायक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य व राजकारण यांचा संबंध आहे. पुरस्कार वापसीच्या मुद्यावरुन सरकारला विचारवंतांची धास्ती वाढू लागली आहे.
दरम्यान, साहित्याची नाळ ही माणसाच्या निर्मितीशी जोडलेली असते. त्यातून बंडाची प्रेरणा मिळते. सुसंवादाला सध्या चांगले दिवस राहिले नाहीत. निवडणुकीपुरतेच राजकारण केले जात नाही तर प्रत्येक गोष्टीत राजकारण केले जात आहे. सर्वच धर्मात कट्टरता वाद सुरु आहे. न्यायालयानेदेखील समाजाने असहिष्णुता वाढल्याचे म्हटले आहे. प्रत्येकाने समाज हा काळजीपूर्वक समजून घेऊन माणसाच्या मनातील घाण बाहेर काढणे गरजेचे आहे. प्रत्येकाने विवेकाने वागले तर कायद्याचे राज्य तयार होईल, असे सांगत जोपर्यंत विचार आहे तोपर्यंत फॅसिझम लागू होणार नाही, असे दीक्षित यांनी सांगितले.
अभिव्यक्ती स्वातंत्र्यामुळे विचारवंत पुरस्कार परत करु लागले आहेत. विचारवंतांवर होणारे हल्ले चिंताजनक व क्लेषदायक आहेत. त्यामुळे संघर्षावर विश्वास ठेवून हस्तक्षेप करुन राजकारण बदलून समता व विज्ञानवादी विचार पुढे नेण्याची गरज कांगो यांनी बोलून दाखविली.