तर विधानपरिषदेसाठी वेगळा विचार करावा लागेल


१९ मतदार
पंढरपुरातील तीर्थक्षेत्र विकास
आघाडीच्या नगरसेवकांचा इशारा

पंढरपूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत श्री विठ्ठल परिवाराला दिलेला शब्द पाळण्याबाबत जिल्ह्यातील नेतेमंडळींनी अग्रेसर रहावे, अन्यथा राजकारणात कोणीही कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो हा संदेश जिल्ह्याच्या राजकारणात परिचित झाला असल्याने आम्हास विधानपरिषदेच्या निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक नामदेव भुईटे व शुकूर बागवान यांनी दिल्याने विधानपरिषदेच्या निवडणुकीला पंढरीत वेगळे वळण लागले आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत यापुर्वी एकत्रितपणाने राजकारण करणारे प्रशांत परिचारक व दीपक साळुंखे यावेळी विधानपरिषदेच्या निवडणुकीत आमने-सामने उभे आहेत. त्याच धर्तीवर पंढरपूरच्या स्थानिक राजकारणात विधानपरिषदेचे भाजप आघाडीचे उमेदवार प्रशांत परिचारक यांचे विरोधक असणारे आ. भारत भालके व कल्याणराव काळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार दीपक साळुंखे यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत विठ्ठल परिवाराची साथ हवी असल्यास कल्याणराव काळे यांना सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेत स्वीकृत संचालक म्हणून निवडण्यात यावे, अशी मागणी जिल्ह्यातील नेतेमंडळींकडे केली आहे. 
याबाबत पंढरपूरच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांची बैठक पार पडली. आ. भारत भालके यांच्या निवासस्थानी जिल्हा मध्यवर्ती बँक व विधानपरिषदेच्या प्रचारासाठी पार पडलेल्या बैठकीत जिल्ह्याचे नेते विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आ. दीपक साळुंखे यांच्यासह इतर उमेदवारांसमोर विठ्ठल परिवाराच्या नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्यांनी जिल्हा बँकेच्या स्थानिक पदाधिकार्‍यांकडून यापूर्वी झालेल्या अडवणुकीच्या राजकारणाचा आक्रमकपणे पाढा वाचला.
भविष्यात विठ्ठल परिवाराची अडवणूक थांबविण्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी कल्याणराव काळे यांची निवड करण्याची एकमुखी मागणी सर्व नगरसेवकांनी केली. विधानपरिषदेच्या निवडणुकीपूर्वी याबाबत जिल्ह्यातील सर्व नेतेमंडळींनी विठ्ठल परिवाराच्या विधानपरिषदेच्या मतदारांसमोर याबाबतची आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी; अन्यथा विधानपरिषदेच्या निवडणुकीत वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा नगरसेवक भुईटे व बागवान यांनी दिला आहे. १९ मतदार विधानपरिषदेसाठी काळे-भालके गटाचे एकूण १९ मतदार आहेत. त्यामध्ये पंढरपूर नगरपरिषदेत १५ नगरसेवक, मंगळवेढा नगरपरिषदेत तीन नगरसेवक तर चार जिल्हा परिषद सदस्यांचा समावेश आहे. त्यामुळे हे सर्व मतदारांना खूश ठेवण्यासाठी काळे यांना डीसीसी बँकेवर स्वीकृत सदस्य म्हणून घेण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर आहे.
डीसीसीच्या स्वीकृत संचालकपदावर ठाम
राजकारणात कोणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे अक्कलकोटच्या नेत्यांनी जिल्ह्याला दाखवून दिलेले आहे. त्यामुळे कल्याणराव काळे यांच्या जिल्हा बँकेच्या स्वीकृत संचालकपदाच्या मागणीबाबत आग्रही असणार्‍या विठ्ठल परिवाराचे नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य ऐनवेळी कोणती भूमिका घेणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.