भीमेत मळी सोडणार्‍या कारखान्यांवर कारवाई करा

शहराला होत असलेल्या पिवळ्या रंगाच्या पाणीपुरवठय़ाबाबत आ. प्रणिती शिंदे यांनी सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन तेथील पिवळसर पाण्याची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत महापौर सुशीला आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेवक चेतन नरोटे आदी. सोलापूर : साखर कारखान्यांच्या मळीचा अंश असल्यामुळेच सोलापूरला पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत असून, हे पाणी पिण्यासाठी धोकादायक ठरू शकते. प्रदूषण मंडळाने याकडे डोळेझाक केली असून, प्रक्रिया न करता नदीत मळी सोडणार्‍या संबंधित साखर कारखान्यांवर कारवाई करायला हवी, अशी मागणी आ. प्रणिती शिंदे यांनी केली. 

शहरात पिवळ्या पाण्याच्या पुरवठय़ाने नागरिक हवालदिल झाले आहेत. या वृत्ताची आ. प्रणिती शिंदे यांनी दखल घेतली. महापौर सुशीला आबुटे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेवक चेतन नरोटे यांच्यासमवेत सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रास भेट देऊन टाकळी पंपगृहातून येणार्‍या पाण्याची पाहणी केली. पाण्यात मोठय़ा प्रमाणावर मळीचे अंश दिसले. यामुळे शुद्धीकरण केंद्रातील फिल्टर बेड चोकअप होत असल्याचे निदर्शनाला आहे. पाण्याचा असाच फ्लो राहिला तर शुद्धीकरण केंद्रात मोठा बिघाड होण्याची शक्यता आ. शिंदे यांनी व्यक्त केली. आरोग्य विभागाने पाणी चांगले असल्याचा निर्वाळा दिला असला तरी पिवळे पाणी धोकादायक ठरू शकते, असा इशारा त्यांनी दिला. महापालिका प्रशासन पाण्याच्या शुद्धीकरणासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील आहे. पण उगमात पाणी दूषित होण्याच्या प्रकारास शासन जबाबदार आहे. याकडे प्रदूषण मंडळाची डोळेझाक झाली असून, पिण्याच्या पाण्यात प्रक्रिया न करता मळी सोडणार्‍या संबंधित साखर कारखान्यांचा शोध घेऊन त्यांना तंबी द्या अशी मागणी त्यांनी केली. 
या पाहणीनंतर महापालिकेत आयुक्त काळम—पाटील यांची भेट घेऊन पिवळ्या पाण्याच्या स्थितीबाबत माहिती घेतली. यावेळी आ. शिंदे यांनी शुद्धीकरण केंद्रातून आणलेल्या पाण्याचे नमुने दाखविले. गढूळ पाणी पाहून आयुक्त संतापले. त्यांनी कर्मचार्‍यांची झाडाझडती घेतल्यावर बेड स्वच्छ करताना नमुने घेतल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यावर आ. शिंदे यांनी पाण्यात मळीचे अंश असल्याचे निदर्शनाला आणून दिले. 
आयुक्तांनी १६ डिसेंबर रोजी प्रकार उघड झाल्यापासून केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. उजनी जलवाहिनीतून ४0 तर टाकळीतून ६0 टक्के पाणी शहराला पुरविले जाते. टाकळी वाहिनीतील पाणी बाधित असून, याबाबत राज्य प्रयोगशाळेचा अहवाल मागविला असून, त्यात पाणी शुद्ध असल्याचा अभिप्राय असल्याचे सांगितले