नालासोपाऱ्यातील संपूर्ण कुटुंब नऊ महिन्यांपासून बेपत्ता

Vasai_Family_Missing_1ठाणे : नालासोपाऱ्याच्या नालेश्वर नगरमधील एक संपूर्ण कुटुंबच मागील नऊ महिन्यांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. सात जणांच्या या कुटुंबात सहा मोठी माणसे आणि दहा महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे.
रामदास इगवे असं कुटुंबप्रमुखाचं नाव असून नालासोपारा पूर्वच्या नालेश्वर नगरमधील वैष्णवी सदन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. रामदास इगवे वय 55 वर्ष, मंगलबाई इगवे (वय 42 वर्ष), भाविन रामदास इगवे (वय 25 वर्ष), आशा भाविन इगवे (वय 20 वर्ष), त्यांची एक दहा महिन्याची मुलगी, सचिन रामदास इगवे (वय 24 वर्ष), त्याची पत्नी उज्ज्वला सचिन इगवे (वय 21 वर्ष), असं सात जणांचं कुटुंब आहे. मात्र मागील नऊ महिन्यापासून या कुटुंबाशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत.
Vasai_Family_Missing_2

या प्रकरणी तुळींज पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.
आशा इगवेची प्रस्तुती झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यात सासरची मंडळी तिला घेऊन गेले होते. यानंतर तिच्या आई-वडिलांनी आठ दिवसांतच मुलीच्या सासरी गेले, परंतु संपूर्ण इगवे कुटुंबच घरी नसल्याची त्यांना माहिती मिळाली. ते कुठे गेले याची शेजाऱ्यांनाही कल्पना नसल्याने सर्वच जण चिंतेत आहेत. आशाची आई राजश्री प्रभाकर घरावत यांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन लागत नव्हता. याशिवाय गुजरात, मुंबई, हैदराबाद या ठिकाणी असणाऱ्या नातेवाईकाकडे सर्वत्र चौकशी केली, परंतु कुठेच तपास लागत नसल्यामुळे घरावत कुटुंबीय चिंताग्रस्त झाले.
अखेर 8 डिसेंबर 2015 रोजी त्यांनी संपूर्ण कुटुंबच बेपत्ता झाले असल्याची तक्रार नालासोपारा येथील तुळींज पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी फक्त तक्रार घेतली आहे, पण ते तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

संपूर्ण कुटुंब मागील नऊ महिन्यापासून बेपत्ता असल्याने स्थानिकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे. इगवे कुटुंबियांचा ज्योतिष पाहण्याचा व्यवसाय होता. कदाचित या व्यवसायासाठी कुटुंब स्थलांतरित झालं असावं, असा अंदाज पोलिस बांधत आहेत. तसंच त्यांचं शेवटचं लोकेशनही पोलिसांना सापडत नसल्याने तपासात आडचणी येत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. पण लवकरात लवकर आम्ही तपास करु असं पोलिस सांगत आहेत.