21 मेगापिक्सल कॅमेरा, जबरदस्त यू यूटोपिया स्मार्टफोन लाँच

मुंबई: भारतीय मोबाईल कंपनी मायक्रमॅक्सने खास भारतीय युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी सुरू केलेल्या यू टेलिवेंचर्स या नव्या कंपनीच्या माध्यमातून आजवरचा सर्वात दणकट फीचर्स असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. यू युटोपिया असं या स्मार्टफोनचं नाव आहे.

यू कंपनीने यू युरेका, यू युरेका प्लस, यू युनिक, यू युफोरिया असे लोकप्रिय तसंच स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. आपला आधीचा लौकिक कायम ठेवत याच मालिकेत आता यू युटोपिया हा सर्वाधिक हायएन्ड फीचर्स असलेला स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत उतरवण्यात आला. हा स्मार्टफोन फक्त अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरच उपलब्ध आहे. यू युटोपियाच्या    विक्रीपूर्व नोंदणीला आज  दुपारी  दोन   वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. तर प्रत्यक्ष डिलीव्हरीसाठी 26 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

आजच्या तारखेला पृथ्वीवरील सर्वात चांगला आणि सशक्त फोन अशी जाहिरात करण्यात आलेल्या यू युटोपियाची किंमत फक्त रू. 24999 आहे.

गूगलच्या अँड्राईड 5.1.1 लॉलिपॉपवर आधारित सायनोजेनमोड ओएसवर हा फोन चालतो. 4G साठी सक्षम असलेल्या या स्मार्टफोनची स्क्रीन 5.2 इंच मोठी असून WQHD IPS या प्रकारातील शार्प कंपनीची आहे. यू युटोपियाच्या स्क्रीनचं पिक्सेल रिझोल्यून क्यूएचडी म्हणजे 1440×2560 पिक्सेलचा आहे. तसंच पीपीआय म्हणजे पिक्सेल पर इंच इन्डेक्स 565 आहे.

जगातील सर्वाधिक चांगला समजला जाणारा प्रोसेसर स्नॅपड्रॅगन 810 प्रोसेसर यू युटोपियामध्ये असून फोनची बांधणी 64 बीटवर करण्यात आलीय. तसंच या स्मार्टफोनची रॅम 4GB असून इनबिल्ट मेमरी 32GB आहे. तसंच एक्सटर्नल मेमरी कार्डच्या सहाय्याने मेमरी 64GB पर्यंत वाढवताही येऊ शकते.

यू युटोपियाचा मुख्य म्हणजे रिअर कॅमेरा 21 मेगापिक्सेलचा असून त्याने 4K दर्जाचा व्हिडिओ शूट करता येऊ शकतो. तसंच 120 फ्रेम पर सेकंद या गतीने स्लो मोशन व्हिडिओही शूट करण्याची सुविधा या स्मार्टफोनमध्ये आहे. फास्ट मूव्हिंग ऑब्जेक्टचा फोटोही अगदी प्रोफेशनल कॅमेऱ्यासारखा काढता यावा यासाठी 192 पॉईंट फेस डिटेक्शन बिल्ट इन आहे.

तरूणांसाठी सर्वाधिक औत्सुक्याचा विषय म्हणजे सेल्फी कॅमेरा. यू युटोपियामध्ये 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. तसंच या स्मार्टफोनची संपूर्ण बॉडी हे मेटलची आहे

आयफोनसह फक्त काही निवडक स्मार्टफोनमध्ये असलेली फिंगरप्रिंट स्कॅनरची सुविधा यू युटोपियामध्येही आहे. त्याशिवाय सुपरफास्ट चार्जिंगची सुविधा असलेली तब्बल 3000mAh बॅटरी या स्मार्टफोनमध्ये आहे.