श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना निवडणुक......... उमेदवार निवडीचे अधिकार आ.भारत भालके व कल्याणराव काळे यांना
पंढरपूर लाईव्ह वृत्त
पंढरपूर (दि.17) श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीत उमेदवार निवडीचे सर्वाधिकार विद्यमान चेअरमन आमदार श्री भारत भालके यांना देण्याचा निर्णय विठ्ठल परिवाराच्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री कल्याणराव काळे, मा.जि.प.सदस्य राजुबापू पाटील, कारखान्याचे उपाध्यक्ष लक्ष्मणआबा पवार, श्री विठ्ठल सुतगिरणीचे चेअरमन दिनकर पाटील तसेच सुरेशदाजी बागल, विलास भोसले, ज्येष्ठ सभासद चंदुलाल शहा, माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड, संचालक युवराज पाटील, भगिरथ भालके आदींसह कारखान्याचे सर्व संचालक मोठ्या संख्येने पदाधिकारी, शेतकरी, सभासद उपस्थित होते.
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात विचार विनिमय बैठकीचे आयोजन येथील दाते मंगल कार्यालय,पंढरपूर येथे करण्यात आले होते. यावेळी विठ्ठल परिवारातील सर्व प्रमुख नेत्यांसह मंगल कार्यालय भरून लॉनवर बाहेर 10 हजारांपेक्षा जास्त सभासद, शेतकरी, पदाधिकारी, कार्यकर्ते हजर होते.
यावेळी बोलतांना आमदार भालके म्हणाले की, श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत यावेळी 21 जागा आहेत. मागील संचालक मंडळापेक्षा 5 जागा कमी झाल्यामुळे विठ्ठल परिवाराचे सर्व नेते विचार विनिमय करून जुन्या आणि नव्या चेहर्यांचा समन्वय साधून उमेदवार निवडतील अशी ग्वाही दिली. मागील 5 वर्षात कारखान्याने केलेल्या प्रगतीचा आढावा घेत आमदार भालके यांनी विठ्ठल परिवार एकसंघ झालेला असतांना विरोधक कारखान्याची निवडणूक लादण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे गाङ्गील राहून चालणार नाही. मी अधिवेशन सोडून आलेलो आहे. विठ्ठल परिवारासही जिल्हा बँकेत संधी मिळाली पाहिजे याकरिता श्री कल्याणराव काळे यांना स्विकृत संचालक म्हणून घेण्यासाठी शब्द घेण्यात आलेला आहे. कारखान्याच्या निवडणुकीत जे लोक पॅनल उभा करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांचा बोलविता धनी वेगळा असल्याचे सांगून भालके म्हणाले की, परिवारात लोकशाही परंपरा जपली जाते. राजकारणात कुणीही कायमचा शत्रु नसतो त्यामुळे नाराज होऊन गेलेल्या जुन्या सहकार्यांना आपल्यामध्ये परत सामावून घेण्यात येत असल्याचे सांगितले.
तसेच दोन दिवसात आलेल्या इच्छुकांच्या अर्जामधून स्कुटीनी करून उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितले जाईल त्यांनीच अर्ज भरावे असे अनेक वक्त्यांनी सुचविले ते सर्वांनी मान्य केले आहे. सर्व सभासदांनी हात वर ऊंचावून अधिकार नेत्यांना दिले. यावेळी बोलतांना सहकार शिरोमणी वसंतराव सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री कल्याणराव काळे म्हणाले की, साखर कारखानदारी सध्या अडचणीच्या काळातून वाटचाल करीत आहे. संचालक मंडळ निवडतांना सर्वांना संधी मिळेल असा प्रयत्न केला जाईल. सभासदांनी आमच्यावर जो विश्वास टाकला आहे त्यानुसार संचालक मंडळ निवडतांना कुणावरही अन्याय होणार नाही, विठ्ठल परिवार एकसंध राहिल यासाठी प्रयत्न केला जाईल असे सांगितले.
यावेळी विठ्ठल सुत गिरणीचे चेअरमन दिनकर पाटील, श्री विठ्ठल कारखान्याचे व्हा.चेअरमन सर्वश्री लक्ष्मणआबा पवार, संचालक राजुबापू पाटील, संचालक मोहनआण्णा कोळेकर, बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते नितीन बागल व देवानंद गुंड-पाटील आदींसह सभासद, शेतकर्यांनीही मनोगत व्यक्त केले.
त्यांचा बोलविता धनी वेगळा- विठ्ठल सहकारीची निवडणूक लढवण्याची धडपड करणार्यांचा बोलविता धनी वेगळा आहे. यापूर्वी त्यांनी खर्डी ग्रामपंचायत, पांडुरंगची निवडणूक का लढवली नाही असा सवाल संचालक राजुबापू पाटील यांनी आपल्या भाषणात केला.