पंढरीत विठ्ठल मंदिर परिसरातील एका लाॅजला आग...
पंढरपूर लाईव्ह वृत्त
दि. 11 डिसेंबर 2015
पंढरीतील विठ्ठल मंदिराच्या परिसरात पश्चिम द्वारा समोरच असलेल्या मंगल लाॅजच्या वरच्या मजल्यावर आज दुपारी आग लागली होती. मात्र अग्निशमक दलांच्या जवानांनी मोठ्या हिकमतीने ही आग विझवण्यात यश मिळवले.
आगीमुळे धुरांचे लोटच्या लोट मंदिराच्या आसमंतातून दिसून येत होते . यामुळे भाविकांसह नागरिक काही काळ भयभीत झाले होते. आग लागल्याचे समजताच सगळीकडे काहीशी तारांबळ उडाल्याचे आढळून आले. या आगीमुळे लाखोंचे नुकसान झाल्याचे समजते.
जिथे आग लागली ते मंगल लाॅजच्याच इमारतीत एक बँक सुध्दा आहे. तसेच या इमारतीला लागुन अगदी चिटकून चिटकून अनेक प्रासादिक साहित्य विक्रीची, फोटो -फ्रेम विक्री ची, हळदी कुंकू बुक्का अष्टगंध विक्रीची व ग्रंथ विक्री ची दुकाने आहेत. हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. अग्निशमन दलाने ही आग वेळीच नियंत्रीत केली यामुळे खुप मोठा अनर्थ टळला व मोठी हानी टळली. आग लागल्याचे समजताच बघ्यांनी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
अग्निशमन चार गाड्या याठिकाणी हजर होत्या. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांसोबतच स्थानिक नागरिकांनी व व्यावसायिकांनीही अटोकाट प्रयत्न केले. नागरिकांनी घटनेचे गांभिर्य ओळखून केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
आग लागलेच्या घटनेची माहिती मिळताच आ.भारतनाना भालके, माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, तहसिलदार श्री.गुरव, पोलिस निरीक्षक किशोर नावंदे, वाहतुक शाखेचे निरीक्षक निलेश गोपाळचावडीकर आदींनी घटनास्थळी भेट दिली.