भारतीय वंशाच्या महिलेने बनवला 'सुपर कंडोम'
नवी दिल्ली : भारतीय वंशाच्या अमेरिकन प्राध्यापिका आणि त्यांच्या टीमने ‘सुपर कंडोम’ विकसित केला आहे. हा ‘सुपर कंडोम’ एचआयव्ही व्हायरसचं संक्रमण रोखू शकेल, असा दावा या टीमने केला आहे. याशिवाय शरीरसुखाचा आनंदही द्विगुणीत होईल असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
महुआ चौधरी आणि टीमचा शोध
अमेरिकेच्या टेक्ससमधील ‘ए अँड एम युनिवर्सिटी’मध्ये महुआ चौधरी आणि त्यांच्या टीमने हायड्रोजेल कंडोम बनवला आहे. या सुपर कंडोममुळे गर्भधारणा रोखता येईलच, शिवाय एचआयव्ही व्हायरसचं संक्रमण रोखू शकेल, असा दावा करण्यात आला आहे.
हायड्रोजेल नावाच्या इलॅस्टिक पॉलिमरचा वापर करून हा कंडोम तयार करण्यात आला आहे.
“केवळ एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठीच नव्हे तर या व्हायरसचं मूळापासून उच्चाटन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत” असं महुआ चौधरी यांनी म्हटलं आहे.
“‘सुपर कंडोम’ हा एचआयव्ही रोखण्यास तसंच शारिरिक संबंधामुळे निर्माण होणारे गुप्तरोग, नको असलेली गर्भधारणा रोखण्यासही मदत करेल. जर आमचा हा प्रयोग यशस्वी झाला तर एचआयव्ही संक्रमण रोखण्यातील तो क्रांतीकारी प्रयोग ठरेल”, असंही महुआ चौधरी म्हणाल्या.
नमुना तयार, लवकरच बाजारात येणार
सध्या या कंडोमचा नमुना तयार झाला आहे. पण अद्याप पेटंट न मिळाल्यामुळे बाजारात येण्यास विलंब लागेल असं सांगण्यात येत आहे. तरीही 6 महिन्यांत या कंडोमची चाचणी होईल, त्यानंतर हा बाजारत उपलब्ध होईल.
