शहरात पिवळसर पाण्याचा पुरवठा
सोलापूर : शहरात गेल्या दोन दिवसांपासून पिवळसर पाण्याचा पुरवठा होत आहे. हे पाणी पिण्यालायक असल्याचा खुलासा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केला आहे.
शहराला भीमेतून टाकळी येथून पुरवठा होणार्या पाण्याला दोन दिवसांपासून पिवळा रंग येत आहे. पाणी शुद्ध करूनही हा रंग
;गेलेला नाही. त्यामुळे सगळीकडे पिवळसर पाणीपुरवठा होऊ लागल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आल्यावर आरोग्य विभागाने संबंधित पाण्याचे नमुने घेतले.
जिल्हा आरोग्य प्रयोगशाळेत हे पाणी तपासल्यावर जैविक घटक योग्य असल्याचे स्पष्टीकरण प्रयोगशाळेने दिले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपशाखाधिकारी यांना भीमेतील पाण्याबाबत कळविण्यात आले आहे. पुण्यातील राज्य आरोग्य प्रयोगशाळेच्या मुख्य वैज्ञानिकांचेही पिवळसर रंग घालविण्यासाठी उपाययोजनेबाबत मार्गदर्शन घेण्यात आले आहे. वाकडेवाडी येथील तंत्रज्ञ अधिकारी यांच्याकडे याबाबत विचारणा करण्यात आली आहे. प्रयोगशाळेच्या अभिप्रायानंतर पाणी पिण्यायोग्य असल्याने नागरिकांनी याबाबत घाबरू नये, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य अधिकारी गंगाधर दुलंगे यांनी केले आहे. दरम्यान होनमुर्गी फाट्याजवळ फुटलेली जलवाहिनी तातडीने दुरूस्त करण्यात आली. दुरूस्तीनंतर टाकळी येथील पंप सुरू करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला. चोवीस तासांच्या ब्रेकनंतर आलेला लोड नियंत्रित करण्याचे काम सुरू असल्याचे पाणीपुरवठा अधिकार्यांनी सांगितले. |
