पांडुरंगाच्या पालखीचे उत्साहात स्वागत
ज्ञानेश्वर संजीवन समाधीसाठी गेलेला विठ्ठलाचा रथ आज पंढरपुरात परतला. वाखरी येथे रथाचे स्वागत करताना विलास महाजन, हनुमंत ताठे, दुसर्या छायाचित्रात फुलांनी सजविलेला विठ्ठलाचा रथ. पंढरपूर : टाळ-मृदंगाचा गजर, विठोबा-विठोबाचा जयघोष, फुगड्यांचा खेळ, रथातील बैलजोडीच्या पायावर पाणी वाहून पांडुरंगाच्या परतीचा आनंदोत्सव शनिवारी पंढरपुरात साजरा करण्यात आला. निमित्त होते पांडुरच्या पालखी सोहळ्याचे.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पंढरीच्या पांडुरंगाच्या पालखीने २५ नोव्हेंबर रोजी आळंदीकडे प्रस्थान ठेवले होते. समाधी सोहळा झाल्यावर पुन्हा १२ डिसेंबर रोजी विठोबाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आणि सात दिवसांनंतर सायंकाळी पाचच्या सुमारास वाखरीत पोचले.
पंढरीची पालखी वाखरीत आल्यानंतर पंढरपूरचे प्रांताधिकारी संजय तेली यांनी रथाचे स्वागत केले. यावेळी मंदिर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन, पूजा समिती प्रमुख हनुमंत ताठे आदी उपस्थित होते.
विठ्ठलाच्या रथातील विधिवत पूजा झाल्यानंतर पुन्हा वाजतगाजत रथ नामदेव पायरीपर्यंत रात्री साडेआठच्या सुमारास पोहोचला. त्यानंतर रथातून पांडुरंगाच्या पादुकांची पालखी खाली घेण्यात आली आणि नामदेव पायरीसमोर दुतर्फा वारकरी-टाळकर्यांनी लांबपर्यंत रांग लावून भजन-कीर्तन केले. यावेळी स्थानिकांना पांडुरंगांच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
रात्री नऊच्या सुमारास विलास महाजन आणि हनुमंत ताठे यांच्या हस्ते विधिवत पूजा झाल्यानंतर पादुका मंदिरात ठेवण्यात आल्या.
