निकालाचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेऊ – एकनाथ खडसे
10 डिसेंबर : अभिनेता सलमान खान याच्याविरोधातील फूटपाथ अपघात प्रकरणी उच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे, याचा अभ्यास करून त्यानंतरच राज्य सरकार पुढे काय करायचं याचा निर्णय घेईल, असं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज (गुरुवारी) स्पष्ट केलं. फूटपाथ अपघात प्रकरणात सलमान खानवर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांतून आज (गुरूवारी) उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली.

उच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे, याची प्रत आम्हाला मिळालेली नाही. त्याची प्रत मिळाल्यावर त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर गरज वाटल्यास या प्रकरणी राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला मागविण्यात येईल आणि त्यानंतर सरकार सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय घेईल, असं खडसेंनी स्पष्ट केलं.
फूटपाथ अपघात प्रकरणी सत्र न्यायालयाने सलमान खानला सुनावलेली पाच वर्षांची शिक्षा उच्च न्यायालयाने गुरुवारी रद्द केली आणि त्याच्यावर लावलेल्या सर्व आरोपांतून त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली