अवैध वाळू वाहतुक करणार्या 7 होड्या जप्त... पंढरपूर तहसिलदारांची कारवाई
पंढरपूर लाईव्ह वृत्त
पंढरपूर दि.18 :- तालुक्यातील भीमा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतुक करणा-या 7 होड्यांवर महसूल व पोलीस प्रशासनाने संयुक्तरीत्या कारवाई करुन त्या जप्त केल्या असल्याची माहिती तहसिलदार गजानन गुरव यांनी दिली.
मौजे इसबावी येथील पाणीपुरवठा केंद्राजवळ होड्यातून अवैध वाळू उत्खनन व वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्या संबधीत ठिकाणी विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार महसुल व पोलिस प्रशासनाच्या वतीने संयुक्तरीत्या कारवाई करुन 7 प्रवासी होड्या जप्त करुन शासकीय धान्य गोदाम पंढरपूर येथे ठेवण्यात आल्या आहेत. या प्रकरणी संबधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचेही तहसिलदार गजानन गुरव यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेत्वृत्वाखाली व उपविभागीय अधिकारी संजय तेली यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात तहसिल कार्यालयाकडून अवैध गौणखनीज वाहतूकीसाठी प्रतिंबधात्मक कारवाई मोठ्या प्रमाणात सुरु असून, माहे एप्रिल ते नोव्हेंबर 2015 पर्यंत अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करणा-या 82 वाहनांवर दंडात्मक कारवाई करुन 73 लाख 65 हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंढरपूर शहर व तालुका पोलिस स्टेशन येथे एकूण 21 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याचेही तहसिलदार गुरव यांनी सांगितले.
यावेळी व्ही. बी. जाधव (तलाठी, पंढरपूर), बालाजी पदुलवाड (मंडल अधिकारी), तलाठी मिलींद सावंत, बाळासाहेब कदम, रविंद्र शिंदे, विष्णु व्यवहारे, रणजित मोरे, मुसा काझी व चंद्रकांत ढवळे (मंडल अधिकारी) आदी उपस्थित होते.

