राज्याला दुष्काळाच्या संकटापासून मुक्त कर महसूल मंत्री खडसे यांचे विठ्ठलाला साकडे

 पंढरपूर दि.22: राज्यात सतत पडत असलेला दुष्काळ तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी या संकटापासून मुक्त कर, राज्यातील जनता सुखी समाधानी होऊ दे असे विठ्ठल चरणी साकडे घातले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी  केले.

            कार्तिकी एकादशी निमित्त श्री.विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा त्यांनी सपत्नीक केली.
 या पुजेनंतर तुकाराम भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार  सोहळयाप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी आमदार सुरेश खाडे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, श्री. उल्हास पवार, जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे  उपस्थित होते.
           मंदिर समितीच्या वतीने श्रीविठ्ठलाची पुजा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सहकुटूंब केली.
 महसूल मंत्री खडसे म्हणाले, पंढरपूर येथे दरवर्षी लाखो वारकरी भाविक येतात. शेकडो वर्षाची ही वारकरी परंपरा आहे. या शहरात येणार्‍या भाविकांची चांगली व्यवस्था झाली पाहिजे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. शहरावर सर्व प्रकारच्या नागरी सेवांचा ताण वाढत आहे. तो कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.यासाठी 65 एकरात वारकर्‍यांना विविध सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. तेथे पंढरपूरचे उपनगर उभे राहिले पाहिजे. त्या ठिकाणी गटारी, रस्ते, पाणी पुरवठा, शौचालय आदि  कायमस्वरुपी व्यवस्था करण्यात येणार आहेत. तसेच वारकर्‍यांना भजन कीर्तनासाठी प्रति वाळवंट तयार करण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. संतांच्या विचाराचा ठेवा व संस्कार पुढील पिढी पर्यंत गेले पाहिजेत यासाठी संत विद्यापीठाची आवश्यकता आहे. यासाठी जागा उपलब्धतेबाबत प्रयत्न  करण्यात येत असल्याचे सांगितले.
            प्रारंभी जिल्हाधिकारी तथा मंदिर समितीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी उपस्थितांचा सत्कार केला. त्यानंतर प्रास्ताविकात पंढरपूर येथे येणार्‍या भक्तांसाठी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याद्वारे जास्तीत जास्त सुविधा देण्याचा शासनाचा, प्रशासनाचा व मंदिर समितीचा प्रयत्न आहे. येणार्‍या भाविकांना सर्व सुख सुविधा देण्यासाठी कटीबध्द आहोत. याला शासनाचे पाठबळ आहे. येणार्‍या आषाढीवारीपर्यंत सर्व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे  सांगितले.               यावेळी महसूल मंत्री खडसे यांच्या समवेत शासकीय महापुजा करण्याचा मान नाशिक जिल्ह्यातील पो. मु जादुवाडी ता. मालेगाव (कॅम्प) येथील वारकरी दामोदर रतन सोमासे (वय 85 वर्षे) आणि त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दामोदर सोमासे (वय 78 वर्षे) यांना कार्तिकी यात्रेतील मानाचे वारकरी म्हणून बहुमान मिळाला.  श्री. सोमासे हे मजुरी व शेती व्यवसाय करीत असून गेली पाच वर्षे ते वारी करीत आहेत. महापुजेचा मान मिळाला हा आमच्या जीवनातील सर्वांत आनंदाचा दिवस असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी मंदिर समितीच्या वतीने या मानाच्या वारकर्‍यांचा सत्कार महसूलमंत्री श्री. खडसे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच वर्षभर मोफत प्रवास करण्याबाबत एस.टी.चा पास त्यांच्या हस्ते  देण्यात आला.
या प्रसंगी  मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी शिवाजी कादबाने, प्रांताधिकारी संजय तेली, तहसिलदार गजानन गुरव आदि उपस्थित होते.