एमआयटीच्या विश्‍वशांती घुमटाच्या आवारात मध्यभागी संस्थेच्या प्रमुख चौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य शिल्प साकारणार.... पुणे येथे पत्रकार परिषदेत डॉ.विश्‍वनाथ कराड यांनी दिली माहिती!

पंढरपूर LIVE 29 ऑक्टोबर 2018


एमआयटीच्या चर्चित विश्‍वशांती घुमटामध्ये छत्रपती शिवरायांचे शिल्प उभारण्यात येणार नसल्यावरुन एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ.विश्‍वनाथ कराड यांच्यावर चौफेर टीकेचा भडीमार झाला. संभाजी ब्रिगेडसह कांही संघटनांनी आक्रमकपणे या मुद्द्यावरुन कराड यांचा तीव्र निषेध केला. यानंतर मात्र डॉ. कराड यांनी आपला पवित्रा बदलून एक पत्रकार परिषद घेत त्यामध्ये  छत्रपती शिवरायांचा पुतळा घुमटाच्या आवारात मध्यभागी उभारण्यात येणार असल्याची माहिती पुणे श्रमीक पत्रकार संघाच्या सभागृहात दिलीय.

‘‘ज्याप्रमाणे मानवाच्या कल्याणकर्त्यांमध्ये ज्ञानवंतांचा, वैज्ञानिकांचा आणि तत्वज्ञांचा एक अलौकिक समूह आहे, तसाच एक अलौकिक समूह  त्या कल्याणकारी विचारांना कृतिशील आयाम देणार्‍या छत्रपतींचा आहे  हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरक सुंदर व भव्य शिल्प याच तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशाती प्रार्थना सभागृह या जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या आवारात, अगदी मध्यभागी, संस्थेच्या प्रमुख चौकामध्ये जागा सुनिश्‍चित करण्यात आली असून, महाराजांच्या प्रेरक स्मृतीला शोभेल, असे लवकर उभारण्याचा एमआयटी शिक्षण संस्थेने संकल्प केला आहे व त्यादृष्टीने त्याचे काम प्रगतीपथावर आहे. एमआयटीच्या विश्‍वशांती घुमटाचे आणि त्याच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य व सुंदर शिल्पाचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प एमआयटी संस्थेतर्फे जाहीर करण्यात आला आहे.’’  अशी माहिती माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे.





पुणे, दि. २९ ऑक्टोबर २०१८ : पुणे येथील एमआयटी शिक्षण संस्थेच्या विश्‍वराजबाग, लोणी काळभोर येथील प्रांगणात तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती प्रार्थना सभागृह आणि विश्‍वशांती ग्रंथालय या नावाने जगातील सर्वात मोठा घुमट उभारण्यात आला आहे. दि. २ ऑक्टोबर २०१८ रोजी देशाचे उपराष्ट्रपती मा. श्री. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आणि मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सन्माननीय उपस्थितीत या घुमटाचा लोकार्पण सोहळा पार पडला. विश्‍वशांती प्रार्थना सभागृह आणि ग्रंथालय म्हणून उभारण्यात आलेला हा १६० फूट व्यास आणि २६३ फूट उंची असणारा जगातील सर्वात मोठा आणि एकमेवाद्वितीय असा भारतीय संस्कृती, परंपरा, तत्त्वज्ञानातील मानवतेचा आणि विश्‍वशांतीचा संदेश देणारा घुमट आहे.
माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड यांच्या संकल्पनेतून या जगातील सर्वात मोठ्या विश्‍वशांती घुमटाची निर्मिती करण्यात आली आहे. राष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर आणि राष्ट्रीय कीर्तीचे संगणकतज्ज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर यांच्या मार्गदर्शक सहभागातून जागतिक स्तरावरील एकमेवाद्वित्तीय अशा या घुमटाची उभारणी करण्यात आली आहे.  
ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान आणि सर्व धर्मांची शिकवण यांच्या संगमातूनच विश्‍वात शांती, सहिष्णुता आणि मानवता नांदेल, हे स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेले विचारसूत्र एमआयटी शिक्षण संस्था समूहाने आपल्या शैक्षणिक, सामाजिक कार्याचे ब्रीद म्हणून स्वीकारले आहे. गेल्या चार दशकांच्या कालावधीत एमआयटी शिक्षण संस्थेने स्वीकारलेले हे ब्रीद व विचार संस्थेच्या उपक्रमातून जाणीवपूर्वक साकारण्याचा यशस्वी प्रयत्न करीत आहे. विश्‍वशांती घुमटाची निर्मिती देखील विश्‍वशांती, सहिष्णुता आणि मानवतेच्या चिरंतन स्थैर्यासाठीचा हा शाश्‍वत मूल्यांच्या संगमाचा विचार जागतिक स्तरावर प्रसारित करण्यासाठीच करण्यात आला आहे. 
तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशांती प्रार्थना सभागृह आणि विश्‍वशांती ग्रंथालय या घुमटाकार वास्तूमध्ये मानवी इतिहासात प्रथमच विश्‍वशांती आणि मानवकल्याणाचे कार्य करणारे  ५४ संत, शास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ उदा. संत ज्ञानेश्‍वर, संत तुकाराम, तथागत गौतम बुध्द, भगवान महावीर, संत कबीर, बाबा बुल्लेशहा, महर्षि वेद व्यास, येशू ख्रिस्त, प्रेषित मोझेस, अल्बर्ट आईनस्टाईन, आयझॅक न्यूटन, मायकेल फॅरॅडे, अ‍ॅरिस्टॉटल, सॉक्रेटीस, प्लॅटो इत्यादींचे भव्य पुतळे उभारण्यात आले असून त्यांचा विश्‍वशांतीचा संदेश जगासमोर मांडण्याचा हा विनम्र प्रयत्न आहे. 
कालौघात जगाच्या पाठीवर ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान आणि आध्यात्मिक क्षेत्रात अनेक युगप्रवर्तक, अलौकिक प्रतिभावंतांचा जन्म झाला. या प्रत्येकाने त्यांच्या क्षेत्रात मानवाच्या कल्याणाला अखंड लाभ होत राहील, असा मौलिक अनुभवामृताचा, नवीन संशोधनाचा, दिशादर्शक चिंतनाचा ज्ञानठेवा निर्माण केला आहे. जगातील सर्व प्रतिभावंतांनी आपल्या जीवनव्यापी कार्यातून निर्माण केलेल्या त्या मौलिक ठेव्याच्या संगमतीर्थावरच मानवी संस्कृती टिकून राहणार आहे. या महामानवांच्या शाश्‍वत कार्य स्वरूपापोटी जगात शांती, सामंजस्य सहिष्णुता आणि संवेदनशील मानवता नांदणार आहे. हा कल्याणकारी संदेश प्रतीकात्मकरुपाने मांडण्यासाठी आणि ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञान, अध्यात्म आणि सर्व धर्मांचे संस्थापक व या क्षेत्रातील सर्वच प्रतिभावंतांचे कृतज्ञ स्मरण म्हणून या महापुरुषांचे अतिशय देखणे पुतळे उभारण्यात आले आहेत. 
ज्ञान, विज्ञान, तत्वज्ञानाच्या क्षेत्रात मानवकल्याणाचा विचार जगातील थोर संत, महात्म्यांनी, प्रतिभावंत शास्त्रज्ञांनी आणि द्रष्ट्या तत्वचिंतकांनी जगाला दिला आहे. जागतिक स्तरावर त्या पायाभूत विचारकर्त्यांचा एक अलौकिक समूह आज ओळखला जातो. त्याचप्रमाणे थोर ज्ञानीजनांचे अनुभवामृत, शास्त्रज्ञांचे कल्याणकारी संशोधन आणि तत्वज्ञांच्या मौलिक चिंतनाला प्रत्यक्ष मानवजातीच्या दैनंदिन उपाययोजना लागू होण्यासाठी अपरंपार कार्यकर्तृत्व केलेल्या महान राज्यकर्त्यांचा देखील एक अलौकिक समूह जगात ओळखला जातो. 
अभिमानाची बाब ही, की हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय हे या राजर्षींच्या अलौकिक समूहाचे अग्रणी आहेत, हे केवळ आपण नाही, तर जगातील प्रतिष्ठित विद्वानांनी देखील मान्य केलेले आहे. 







आदर्श आणि समाजातील ललामभूत असणारे छत्रपती शिवाजी महाराज जर निर्माण झाले नसते तर या थोरांचे कल्याणकारी विचार समाजात कदाचित रुजूच शकले नसते. संंत शिरोमणी ज्ञानदेवांनी आणि जगद्गुरू तुकोबारायांनी अद्भूत अलौकिक ओव्यांचे व अभंगांचे सर्जन केले, पण त्या ओव्या प्रत्यक्ष समाजात रुजविल्या, त्या छत्रपती शिवरायांच्या कार्यकर्तृत्वामुळे, हे विसरता येणार नाही. 
छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ओव्या जनमानसात प्रत्यक्ष नांदाव्या, यासाठी जिवाची बाजी लावून कार्यकर्तृत्व केले. रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्ये संस्कारित केलेले नीतिवंत, कीर्तीवंत, ज्ञानवंत आणि वरदवंत राजे यांचे स्वरुप शिवरायांनी प्रत्यक्ष साकारले आणि त्यातून राजधर्माचा जागतिक आदर्श उभा राहिला आहे. 
ज्याप्रमाणे मानवाच्या कल्याणकर्त्यांमध्ये ज्ञानवंतांचा, वैज्ञानिकांचा आणि तत्वज्ञांचा एक अलौकिक समूह आहे, तसाच एक अलौकिक समूह  त्या कल्याणकारी विचारांना कृतिशील आयाम देणार्‍या छत्रपतींचा आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरक सुंदर व भव्य शिल्प याच तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्‍वर विश्‍वशाती प्रार्थना सभागृह या जगातील सर्वात मोठ्या घुमटाच्या आवारात, अगदी मध्यभागी, संस्थेच्या प्रमुख चौकामध्ये जागा सुनिश्‍चित करण्यात आली असून, महाराजांच्या प्रेरक स्मृतीला शोभेल, असे लवकर उभारण्याचा एमआयटी शिक्षण संस्थेने संकल्प केला आहे व त्यादृष्टीने त्याचे काम प्रगतीपथावर आहे. 
एमआयटीच्या विश्‍वशांती घुमटाचे आणि त्याच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य व सुंदर शिल्पाचे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्याचा संकल्प एमआयटी संस्थेतर्फे जाहीर करण्यात आला आहे. 
अशी माहिती माईर्स एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, जागतिक कीर्तिचे संगणक तज्ञ आणि नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्ड पार्लमेंट ऑफ सायन्स, रिलिजन अँड फिलॉसाफीचे अध्यक्ष पद्मभूषण डॉ. विजय भटकर, माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड आणि एमआयटी ए.डी.टी. युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश. तु. कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली. 




महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 33 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com