संतापजनक... नवजात बाळासह मातेने उघडय़ावर रात्र काढली..!
संतापजनक...
नवजात बाळासह मातेने उघडय़ावर रात्र काढली..!
4 May. 2017
या घटनेमुळे मेयोच्या डॉक्टरांच्या कामावर प्रश्न उपस्थित झाला आहे.
मेयोच्या डॉक्टरने सक्तीने रुग्णालयातून काढले
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो)च्या स्त्री व प्रसूती रोग विभागात उपचाराकरिता आलेल्या सहा तासांच्या बाळासह मातेला डॉक्टरांनी गैरवर्तन करत जबरन सुट्टी दिली. त्यामुळे मातेला संपूर्ण रात्र मेयो परिसरात बाळाला कवटाळून उघडय़ावर काढावी लागली. या घटनेमुळे मेयोच्या डॉक्टरांच्या कामावर प्रश्न उपस्थित झाला आहे.
सावनेर मार्गावरील वडगाव येथील झोपडीत धनेश्वरी निशाद या गर्भवतीला ३ मेच्या दुपारी अचानक प्रसूती वेदना सुरू झाल्या. झोपडीतच प्रसूती झाल्यावर शेजारच्यांनी माय-लेकाला तातडीने जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. रक्ताक्षय असल्याने धनेश्वरीला मेयोला पाठविण्यात आले. तासभरात ते मेयोत पोहचले. प्रसूती वार्डात दाखल करताच धनेश्वरीला भोवळ आली, परंतु तिच्याकडे लक्ष देण्याकरिता वार्डात सहा तास डॉक्टर नव्हते. परिचारिकाही कामात व्यस्त होती. त्यानंतर एका डॉक्टरने येऊन तपासले असता धनेश्वरीने डॉक्टरला आजारासंबंधी काही विचारणा केली असता डॉक्टरने उर्मट उत्तरे दिली. ‘तुमको पटता नही तो चलो छुट्टी ले लो.. चलो भागो याहासे.. म्हणण्यापर्यंत डॉक्टरची मजल गेली. संतोषला जबरन केसपेपरवर स्वाक्षरी करण्यास सांगण्यात आले. औषधोपचार तर केला नाहीच. शेवटी पती संतोषने उपचार होत नसल्याचे बघत स्वाक्षरी केली. त्यानंतर लगेच डॉक्टरांनी बाळासह आईला वार्डाबाहेर काढले. त्यामुळे या महिलेला बाळासह संपूर्ण रात्र उघडय़ावर काढावी लागली. केंद्र सरकारकडून माता व बाल मृत्यू नियंत्रणाकरिता कोटय़वधींचा खर्च केला जातो. तेव्हा शासकीय रुग्णालयांत अशा पद्धतीने बाळंत महिला व तिच्या नवजात शिशूला सेवा दिली जात असेल तर सरकारचा हेतू साध्य होणार काय? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
चौकशी करणार
मेयोत प्रत्येकाला उपचार मिळणे हा रुग्णाचा अधिकार आहे. रुग्णालयात असले प्रकार घडले असल्यास दोषींवर कारवाई केली जाईल, परंतु अद्याप कोणतीही तक्रार आली नाही. या प्रकरणाची चौकशी केली जाईल.
–डॉ. प्रदीप दीक्षित, प्रभारी अधिष्ठाता, मेयो, नागपूर