भारताचे चोख प्रत्युत्तर..। पाकिस्तानी सैनिक ठार..!
भारताचे चोख प्रत्युत्तर... 7 पाकिस्तानी सैनिक ठार!
2 May. 2017
श्रीनगर, दि. 2 - पाकिस्तानी लष्कराने भारतीय हद्दीत घुसून दोन भारतीय जवानांना मारुन त्यांच्या मृतदेहांची विटंबना केल्यानंतर भारतानेही पाकिस्तानला त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय लष्कराने दोन पाकिस्तानी बंकर्स उद्धवस्त केले असून, त्यामध्ये सात पाकिस्तानी सैनिक ठार झाले आहेत.
जम्मू मेंढरमधील क्रिष्णा घाटीच्या विरुद्ध दिशेला असलेल्या किरपान आणि पिंपल भागातील दोन पाकिस्तानी बंकर्स भारतीय लष्कराच्या हल्ल्यात उद्धवस्त झाले आहेत. हल्ला झाला त्यावेळी एका बंकरसमध्ये 647 मुजाहिद्दीन बटालियनचे पाच ते आठ सैनिक तैनात होते. सोमवारी जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील कृष्णा घाटी सेक्टरमधील मेंढरमध्ये संघर्षविरामाचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेच्या आत २५० मीटरपर्यंत घुसलेल्या पाकिस्तानी विशेष दलाच्या जवानांनी दोन भारतीय जवानांना मारले त्यानंतर या जवानांचे शीर कापून मृतदेहाची विटंबना केली.
पाकिस्तानच्या या नापाक कृतीनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे. पाकिस्तानच्या या अमानुष कृत्याला चोख उत्तर देण्याचा इशारा भारताने दिला आहे. लष्कराला त्यासाठी सर्वाधिकार देण्यात आल्याचे वृत्त आहे.पाकिस्तानचे लष्करप्रमुख जन. कमार जावेद बाजवा यांनी नियंत्रण रेषेजवळील काही भागाला भेट दिल्यानंतर विशेष दलाचा समावेश असलेल्या सीमा कृती दलाने (बीएटी) हा हल्ला केला.
निमलष्करी दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान पूंछ जिल्ह्याच्या कृष्णाघाटी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेवरील बीएसएफच्या चौकीवर पाकिस्तानी चौकीवरील सैनिकांनी अग्निबाण आणि स्वयंचलित शस्त्रांनी तुफान गोळीबार केला. या हल्ल्यात लष्कराचे नायब सुभेदार परमजीत सिंग आणि बीएसएफच्या २००व्या तुकडीचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर शहीद झाले तर राजेंद्रसिंग नामक जवान जखमी झाला.