सर्व रिपब्लिकन पक्ष गवई गटाच्या रिपाइंत विलीन होण्याचे संकेत
मुंबई : महाराष्ट्रात रिपब्लिकन ऐक्याची पुनरावृत्ती होण्याची चिन्हं आहेत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे विविध गट विसर्जित करुन त्यांचं गवई गटात विलीनीकरण करण्याची हालचाल सुरु आहे. महाराष्ट्र दिनी मुंबईत दलित गटांच्या नेत्याच्या झालेल्या बैठकीत हा मतप्रवाह समोर आला. सर्व दलित गटा-तटाचे नेते, विचारवंत, साहित्यिक, प्राध्यापक, पत्रकारांची बैठक सोमवारी मुंबईतील सांताक्रुझ भागातल्या कलिना कॅम्पसमध्ये झाली. या बैठकीत 1995 च्या ऐक्याच्या पॅटर्नची पुनरावृत्ती करण्याचं मत सर्वांकडून व्यक्त करण्यात आलं. या पॅटर्ननुसार रिपाइंच्या विविध गटांनी विसर्जित होऊन गवई गटाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या मूळ मान्यताप्राप्त पक्षात विलीन होण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. या प्रस्तावाला रामदास आठवले यांनीही अनुकूलता दर्शवली आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत रिपाइंच्या एकाही उमेदवाराला विजय खेचून आणता आला नाही. त्याच पार्श्वभूमीवर रिपाइंच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. या समुहाच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर द्यावी याबाबत समिती स्थापन करुन निर्णय घेण्यात येईल. 1995 मध्ये रिपब्लिकन ऐक्य दाखवून 1996 च्या लोकसभा निवडणुकांत 11-12 उमेदवार देण्यात आले होते. त्यामुळे पक्षाला मतं आणि मान्यता मिळाली होती. त्यामुळे रिपाइंचे विविध गट-तट पुन्हा एकदा विसर्जित होऊन नव्या ऐक्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.