मराठीतील प्रसिध्द कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी’ यांची आज 99 पुण्यतिथी...
सांगोला (सचिन व्हटे):- मराठीतील प्रसिध्द कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे उर्फ बालकवी’ यांची आज 99 पुण्यतिथी आहे.
यानिमीत्ताने पंढरपूर लाईव्ह च्या वतीने त्यांच्या स्मृतीस ही मानवंदना..!
हिरवे हिरवे गार गालिचे - हरीत तृणांच्या मखमालीचे,
त्या सुंदर मखमालीवरती - फुलराणी ती खेळत होती,
गोड निळ्या वातावरणात - अव्याज मने होती डोलत,
प्रणयचंचल त्या भृलीला - अवगत नव्हत्या कुमारिकेला,
आईच्या मांडीवर बसुनी - झोके घ्यावे, गावी गाणी,
याहूनी ठावे काय तियेला? - साध्या भोळ्या त्या फुलराणीला.
पूर विनोदी संध्यावात - डोल डोलवी हिरवे शेत,
तोच एकदा हासत आला - चुंबून म्हणे फुलराणीला,
छानि माझी सोनुकली ती - कुणाकडे गं पाहत होती?
कोण बरे त्या संध्येतून - हळूच पाहते डोकावून?
तो रवीकर का गोजिरवाणा - आवडला आमच्या राणीला?
लाजलाजली या वचनांनी - साधी भोळी ती फुलराणी.
स्वर्भूमीचा जुळवीत हात - नाच नाचतो प्रभातवात,
खेळूनी दमल्या त्या ग्रहमाला - हळूहळू लागली लपावयाला,
आकाशीची गंभीर शांती - मंदमंद ये अवनी वरती,
विरू लागले संशयजाल - संपत ये विरहाचा काल,
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी - हर्ष निर्भर नटली अवनी,
स्वप्न संगमी रंगत होती - तरीही अजुनी ती फुलराणी.
तेजोमय नव मंडप केला - लख्ख पांढरा दहा दिशेला,
जिकडे तिकडे उधळीत मोती - दिव्य वर्हाडी गगनी येती,
लाल सुवर्णी झगे घालुनी - हासत हासत आले कोणी,
कुणी बांधिला गुलाबी फेटा - झगमगणारा सुंदर मोठा,
आकाशी चंडोळ चालला - हा वाङनिश्चय करावयाला,
हे थाटाचे लग्न कुणाचे? - साध्या भोळ्या या फुलराणीचे.
गाऊ लागले मंगल पाठ - सृष्टीचे गाणारे भाट,
वाजवी सनई मारुतराणा - कोकिळ घे तानावर ताना,
नाचू लागले भारद्वाज - वाजविती निर्झर पख्वाज,
नवरदेव सोनेरी रवीकर - नवरी ही फुलराणी सुंदर,
लग्न लागले सावध सारे - सावध पक्षी सावध वारे,
दवमय हा अंतःपाट फिटला - भेटे रवीकर फुलराणीला...